नागपूर: करोना काळात रखडलेल्या एसटी चालक, वाहकांच्या अंतिम पात्रता परीक्षेत उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. एसटी महामंडळाच्या मुख्यालयाने या गंभीर प्रकरणाची दाखल घेत तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

ज्योती उके (यंत्र अभियंता चालक, वर्धा), चंद्रकांत वडस्कर ( विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा), प्रमोद वाघमारे (सहाय्यक वाहतूक निरीक्षक, नागपूर) असे तिन्ही निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. चालक- वाहक पदाच्या चालन परीक्षेत तिघांची समिती होती. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांच्या आदेशाने ही कारवाई झाली. व्हायरल झालेला व्हिडियो हा नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील आहे. त्यात पात्रता परीक्षेसाठी आलेले उमेदवार दिसत आहे .परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवाराकडून २,१०० रुपये द्यावे लागत असल्याचे संभाषण आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. या अहवालावर सोमवारी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. त्यात दिलेल्या आदेशानुसार हे निलंबन झाले. या वृत्ताला नागपूरचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दुजोरा दिला.

हेही वाचा: ‘लिस्ट लागणार आहे, जो पैसे देईल त्याचे नाव लिहा, न देणाऱ्यांचे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाची सरळ सेवा भरती प्रक्रिया२०१९ मध्ये पार पडली होती. पण करोनाची साथ आल्याने प्रक्रिया रखडली होती. शासनाने अंतिम पात्रता परीक्षा घेऊन भरती करण्याच्या आदेश दिले होते. यासाठी १७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चालक आणि वाहकांची अतिंम पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. यात नागपूर विभागातून १८३ तर महाराष्ट्रातून चार ते साडेचार हजार चालक वाहकांची अंतिम परीक्षा घेण्यात आली.अतिंम चाचणी परीक्षेत प्रवाश्यांचा जीवाची काळजी घेण्यासंदर्भातील १८ प्रकारच्या वाहतूक नियमाच पालन एसटी चालक करते किंवा नाही याची तपासणी केली जाते. याच परीक्षेत अपात्र ठरू नये या भीतीपोटी प्रत्येकी २,१०० रुपये गोळा केले जात असल्याचे तसेच शनिवारी लिस्ट लागणार आहे. जो पैसे देईल त्याचं नाव लिहा, न देणाऱ्यांचे नाव लिहू नका असा संवाद व्हीडीयोत आहे. यामुळे पैश्याचा व्यवहार झाला हे व्हीडिओतून दिसून येत आहे.