नागपूर : “जळाला रे जळाला, फसवा शासन परिपत्रक जळाला!” या घोषणा देत शेतकरी संघटनेने (शरद जोशी विचार मंच) नागपूरच्या व्हेरायटी चौकात गुरूवारी आंदोलन केले. महाराष्ट्र सरकारच्या ९ ऑक्टोबर रोजीच्या फसव्या शासन निर्णयाची होळी करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीकांत दौलतकार यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन ३१,६२८ कोटी रुपयांच्या शेतकरी पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, ही केवळ शाब्दिक मदत असून, प्रत्यक्षात जुनेच पॅकेज नव्या नावाने पुन्हा सादर करण्यात आले, असा आरोप दौलतकार यांनी केला.
या पॅकेजनुसार फक्त २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याची एकमेव सुधारणा करण्यात आली असून, याआधी जाहीर करण्यात आलेली २२१५ कोटींचीच तुटपुंजी मदत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय म्हणजे “जुन्या बाटलीत नवी दारू” असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
अॅड. दौलतकार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दिवाळी तोंडावर आली असून देखील अजून एकाही शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचा रक्कम जमा झालेली नाही. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. निवडणुकीपूर्वी फडणवीस यांनी दिलेले ‘सातबारा कोरा करण्याचे’ आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आम्ही सरकारला इशारा देतो की, शेतकऱ्यांचे कर्ज त्वरित माफ करून सातबारा कोरा करा, अन्यथा यापुढे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि मुख्यमंत्र्यांची दिवाळीही साजरी होऊ दिली जाणार नाही.”
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि विदर्भवादी नेते अरुण केदार, महिला जिल्हा अध्यक्षा सुधाताई पावडे, नरखेड तालुका अध्यक्ष वसंतराव वैद्य, तसेच मुकेश मासुरकर, सुनील चोखारे, प्रशांत नखाते, नरेश निमजे, सुमित तांदूळकर, विकास गोहाणे, राहुल बनसोड, राज यादव, आनंद निखार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हे आंदोलन हे फक्त इशारा असून, जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे