यवतमाळ : गाव गाड्याच्या राजकारणात संपूर्ण कुटुंबालाच विजेच्या धक्क्याने ठार करण्याचा कट रचण्यात आला. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून, तिचा पती थोडक्यात बचावला. सविता मनेश पवार (३७) असे मृत महिलेचे नाव आहे. ही खळबळजनक घटना आर्णी तालुक्यातील अंजी नाईक या गावात शनिवारी घडली.
गावागावात ग्राम पंचायत निवडणुकीचे वाद सुरू असतात. अंजी नाईक या गावात पवार कुटुंबियांचे काही वर्षापासून गावातील राठोड, चव्हाण कुटुंबियांशी राजकीय वाद सुरू आहेत. घटनेच्या रात्री सविता मनेश पवार तिचा पती मनेश पवार (४४), मुलगा चंदन (१३) आणि मुलगी परीदी ही शुक्रवारी रात्री जेवण करून झोपी गेले. बाथरूम घराबाहेर असल्याने पहाटे २:३० वाजता सविता उठली.
घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळली. आवाज आल्याने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी सविताच्या उजव्या हाताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर गावात दोन गटाचे राजकारण असल्याने तणाव निर्माण झाला. आपल्या कुटुंबाला ठार करण्यासाठी घराभोवती वीज तारांमधून वीज प्रवाह सोडण्यात आल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी मनेश देवराव पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल मोतीराम राठोड (४७), सूदाम जयराम चव्हाण (६५), गणेश केशव राठोड (५९), विनोद राकृष्ण चव्हाण (४८), राजू कवडू जाधव (३५), चेतन निवृत्ती चव्हाण (२८) सर्व रा. अंजी नाईक, ता. आर्णी या सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
या घटनेनंतर अंजी नाईक गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मात्र पोलीस या घटनेच्या अन्य बाजूनेही तपास करत असल्याची माहिती आहे. या घटनेला दुसरी बाजू असल्याचीही चर्चा गावात आहे. पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.