नागपूर : सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी सलग २४ तास नागपूर- हैदराबाद महामार्गावर चक्का जाम करत वाहतूक कोंडी करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत केल्या प्रकरणात पोलिसांनी माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह सुमारे २००० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली २८ ऑक्टोबरपासून कार्यकर्त्यांनी वर्धा मार्गावरची वाहतूक व्यवस्था वेठीस धरली होती. या महा एल्गार आंदोलनासाठी कापूस संशोधन केंद्राच्या शेजारचे मैदान आरक्षित केले असतानाही आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडले. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि महामार्गावरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेठीस धरली गेल्याने हजारो गाड्या अडकून पडल्या. नेत्यांच्या चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषणांमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचा ठपकाही पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून ठेवला आहे.
हिंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह माजी मंत्री महादेव जानकर, रविकांत तुपकर (बुलढाणा), नितेश कराळे (वर्धा), वामनराव चटप (चंद्रपूर) आणि बबलू जवंजाळ (अमरावती) यांच्यासह २००० हून आंदोलकांच्या नावाचा उल्लेख केला आहे. हिंगणा निषेधाच्या अटींचे उल्लंघन करणे, बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीला अडथळा आणणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
उशिरा सुचले शहाणपण
या महा एल्गार मोर्चात १० ते १२ हजार शेतकरी सहभागी होतील, असा अंदाज पोलिसांच्या गुप्तचर शाखेने व्यक्त केला होता. मात्र त्यापेक्षा दुपटीने अधिक शेतकरी आंदोलनात उतरले. त्यामुळे आधीच आंदोलनाचे नियोजन फसले. शिवाय बंदोबस्ताच्या बाबतीत पोलिसांनी देखील हे आंदोलन अत्यंत निष्काळजीपणे हाताळले. आंदोलकांना रस्त्यावर उतरण्यापासून पोलीस रोखू शकले नाहीत. त्यामुळे २४ तास हजारो वाहने महामार्गावर तुंबली. न्यायालयाने त्याची दखल घेत वाहतूक कोंडी फोडली असली तरी उशीरा का होईना ढिसाळपणातून धडा घेत पोलिसांनी आता आंदोलनस्थळी तडगा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक हालचालींवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
