यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन राज्य सरकारने नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना रद्द केली होती. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर नव्याने अधिसूचना काढून या महामार्गासाठी भूसंपदनाची प्रक्रिया सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. पश्चिम महाराष्ट्रात या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनाथ एकवटले आहेत. या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी या मागणीचे निवेदन शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर पत्रकार परिषदेत हा महामार्ग शेतकरी, व्यवसायिक व उद्योजकांना कसा फायदेशीर आहे, हेसुद्धा कृती समितीने स्पष्ट केले.

नागपूर ते गोवा अंतर अवघ्या ८ ते १० तासांवर

वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सुरू होणारा शक्तिपीठ महामार्ग गोवानजीक पत्रादेवीपर्यंत जाणार आहे. या महामार्गामुळे अनेक तीर्थस्थळं एका मार्गावर येणार असून, नागपूर ते गोवा या प्रवासासाठी लागणारे २१ तासांचे अंतर अवघ्या ८ ते १० तासांवर येणार आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांसह मराठवाड्यातील आठ जिल्हे व पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. या सर्व जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचे या महामार्गाला समर्थन असल्याचा दावा महामार्ग शेतकरी कृती समितीने केला आहे.

हेही वाचा >>>एसटीच्या मोकळ्या जागा विकासकाच्या घशात… संघटना म्हणते धर्मादाय संस्था…

शेतकऱ्यांच्या नावावर स्वयंघोषित नेत्यांकडून विरोध!

शेतकऱ्यांच्या नावाखाली काही स्वयंघोषित नेते विकासाच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप यवतमाळातील शेतकऱ्यांनी केला आहे. जमीन संपादनासाठी भूमिअभिलेख विभागाला सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ठरविताना शेतकऱ्यांशी शासन स्तरावरून चर्चा करून बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन काढावे व जमिनी हस्तांतरित करून घ्याव्या. शेतकरी स्वतःहून आपली जमीन शासनाला द्यायला तयार असल्याने शासनानेसुध्दा मोबदला देताना हात आखडता घेवू नये, असे महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>>“सुधीर मुनगंटीवार मंत्री होत नाही तोवर पादत्राणे…” चंद्रपुरातील ‘या’ व्यक्तीने घेतला संकल्प

२७ला नांदेड येथे १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा

या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू व्हावी याकरिता येत्या २७ जानेवारी रोजी नांदेड येथे १२ जिल्ह्यांतील शेतकरी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनही शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीने केले आहे. यावेळी शक्तिपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष  संजय ढोले, गजानन आडे, विनोद ठाकरे, रामेश्वर जाधव, सुशील जयस्वाल, सिद्धार्थ कुळसंगे, सचिन माहुरे, शैलेश केशरवाणी आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोध करणाऱ्यांची चौकशी करा

शक्तिपीठ महामार्गाला राजकीय नेते व काही शेतकरी स्वार्थापोटी विरोध करत असल्याचा आरोप, कृती समितीने केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत,  त्या सर्व शेतकऱ्यांचे महामार्गाला समर्थन असल्याचा दावा महामार्ग समर्थकांनी केला आहे. महामार्गाला विरोध करणाऱ्यांच्या जमिनी खरोखरच या महामार्गात जात आहे काय, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महामार्ग समर्थक शेतकऱ्यांनी केली आहे.