लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूर जिल्ह्याचा परिसर ऐतेहासिक, पौौराणिक आणि वनराईने नटलेला आहे. डोंगर आहेत, नद्या आहेत, किल्लेही आहेत. शेकडो वर्ष जुनी मंदिरे आजही आस्थेची केंद्र आहे. मुंबईहून, विदेशातून, आलेल्या पर्यटकांना हा सर्वभाग पर्यटनासाठी खुणावतो. यातूनच येथे चित्रपटनगरी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध आहेत, त्यामळे मुंबईप्रमाणे येथेथी चित्रपटनगरी निर्माण करावी, अशी चर्चा सुरू झाली. त्याला मूर्त रुप येऊ घातले आहे. रामटकेच्या खिंडसी तलावाजवळ ही चित्रपटनगरी होणार असून त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांसकृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते. रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी याक्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले. ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या ४० किलोमीटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.