नागपूर : शहराचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले अंकूश धनविजय यांना अंधारात ठेवत त्यांची बनावट स्वाक्षरी करून विकासकाने निवासी क्षेत्रात आलेली चार एकर शेत जमीन मातीमोल दरांत बळकावली. त्या बदल्यात प्रस्ताव दिलेल्या थ्री बीएचकेच्या सदनिकेचा ताबाही माजी पोलीस आय़ुक्तांना दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
२८ सप्टेंबर २०२५ हिंगणा उप निबंधकाचे कार्यालय गाठल्यानंतर माजी पोलीस आयुक्तांना या फसवणूकीचा उलगडा झाला. त्यानंतर लगेच माजी पोलीस आयुक्त धनविजय यांनी बिल्डर प्रविण वालदे विरोधात तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिासंनी बनावटगिरी आणि फसवणूक प्रकणात गुन्हा दाखल केला.
शहराचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले अंकूश धनविजय यांनी मुलीला बक्षिसम्हणून १० हजार चौरस फुटाच्या जमिन दिली होती. तिच्या विक्री प्रकरणात धनविजय यांची बिल्डर वालदेशी सर्वांत प्रथम तोंड ओळख झाली. त्या ओळखीतून वालदेने धनविजय यांच्या नावावर असलेल्या ४ एकर शेत जमिनीची माहिती मिळवली.
दरम्यान वालदेने १० ऑक्टोबर २०२२ ला धनविजय यांचे नाव वापरत भाग नकाशासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडे अर्ज केला. तो करताना वालदेने धनविजय यांची बनावट स्वाक्षरी आणि चुकीचा ई मेल पत्ता आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला. सोबतच धनविजय यांच्या पोलीस आयुक्त कार्यकाळातील जुना पत्ताही वापरला. त्यामुळे धनविजय अंधारात राहिले. दरम्यान आपली जमीन नवीन विकास आराखड्यात आल्याची कोणतीही माहिती धनविजय यांच्यापर्यंत पोचलीच नाही. मात्र वालदेने धनविजय यांच्याशी व्यवहार करताना तिच्या रेडी रेकनर्समध्ये वाढ झाल्याचे दडवून ठेवले. दरम्यानच्या वालदेने बाजारभावानुसार धनविजय यांच्या शेत जमिनीची किंमत ३६ लाख रुपये असल्याचे दाखवले. त्या बदल्यात धनविजय यांना वालदेने जमिनीच्या बदल्यात वर्धा मार्गावर तीन बी एच के सदनिकेचा प्रस्ताव दिला.
मात्र वालदेने जमिनीच्या बदल्यात त्यांना अद्याप सदनिकेचा ताबा दिला नाही. त्याने निवासी क्षेत्रात आलेली शेतजमीनही बनावटगिरी करत हडपली. दरम्यान धनविजय यांनी २८ सप्टेंबरला उप निबंधक कार्यालय गाठत प्रमाणित प्रत मिळवली. तिथे धनविजय यांना वालदेने बनावटगिरी करत फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला. त्या आधारे धनविजय यांनी वालदे विरोधात बनावटगिरी आणि फसवणूकीची तक्रार. दिली. त्या आधारे पोलिसांनी बिल्डर वालदे विरोधात गुन्हा दाखल केला.