भंडारा : दुर्गम भागातील आणि अनेकदा परिस्थितीमुळे कित्येक प्रतिभावान विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेतात. त्यांनी साधी रेल्वे कधी बघितली नसते. एवढेच काय तर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा ते कधी गेलेले नसतात. अशाच सरकारी शाळेत शिक्षण घेत असलेल्या ४० विद्यार्थिनीना थेट विमानात बसायला मिळणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच विमानातून प्रवास करून या विद्यार्थिनींना इस्रोची सारख्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे.

समाज कल्याण विभाग भंडारा अंतर्गत येणार्‍या अनुसूचित जाती व नव बौध्द मुलींची निवासी शाळा राजेदहेगाव येथील ४० विद्यार्थिनींची श्रीहरीकोटा येथील इस्रो सेंटर येथे शैक्षणिक सहल आयोजित केले आहे. समाज कल्याण भंडाराचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या संकल्पेतून हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी पालकमंत्री संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी लगेच मंजुरी दिली.

मागील वर्षभरात सरकारी शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. कॉन्व्हेंटच्या धरतीवर या शाळांमध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. येथे विद्यार्थ्यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सर्व क्लास रूम डिजिटल करण्यात आल्या असून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्यात आला आहे. येथील विद्यार्थिनी राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमाने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि ईतर खासगी विद्यार्थ्यांच्या सोबत स्पर्धेत नव्या जोमाने विद्यार्थी तय्यार होतील यात शंका नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी या विद्यार्थीना घेऊन जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवली. बसद्वारे या विद्यार्थिनी गोंदिया एअरपोर्ट वरून हैदराबाद व हैदराबाद वरून चेन्नई येथे जातील. इस्रो सारख्या मोठ्या संस्थेला भेट देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी ही शैक्षणिक सहल महत्त्वाची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. स्वप्नातही कधी विचार केलेला नसताना आपले पाल्य विमानात बसून जाणार या सुखद धक्क्यांने विद्यार्थिनींना सोडवायला आलेल्या पालकांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.