गडचिरोली : नक्षलवाद्यांचा पॉलिट ब्युरो, केंद्रीय समिती सदस्य भूपतीसह ६१ जणांचे आत्मसमर्पण हे दंडकारण्यातील हिंसक चळवळीच्या अंताच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्रातून नक्षलवाद लवकरच संपेल, मात्र आता खरा धोका शहरी नक्षलवादाचा आहे. ही लढाई ‘शहरी नक्षलवाद विरुद्ध संविधान’ अशी असून, यात विजय संविधानाचाच होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे व्यक्त केला.

चार दशकांहून अधिक काळ दंडकारण्यात सक्रिय असलेला जहाल नक्षल नेता आणि पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोझुला वेणुगोपाल उर्फ भूपती याने आपल्या ६० साथीदारांसह मंगळवारी गडचिरोली पोलिसांपुढे शस्त्रे ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात, नक्षलवादी गणवेशातील भूपतीने शस्त्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवले आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हाती भारतीय संविधान देऊन लोकशाहीच्या प्रवाहात त्याचे स्वागत केले.

देशाच्या इतिहासात प्रथमच पॉलिट ब्युरो सदस्यासह इतक्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केल्याने चळवळीला मोठा हादरा बसला आहे. पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रातिनिधिक स्वरूपात २० नक्षलवाद्यांचे स्वागत केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याचा संकल्प केला असला, तरी महाराष्ट्र त्याआधीच हे ध्येय गाठेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या ऐतिहासिक आत्मसमर्पणानंतर छत्तीसगड आणि तेलंगणामध्येही मोठे कॅडर शस्त्रे खाली ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नक्षलवादी चळवळीतील अंतर्गत मतभेद आणि सशस्त्र लढ्याऐवजी संवादाच्या भूमिकेमुळे हे मोठे परिवर्तन घडले आहे.

अलीकडेच संघटनेची धुरा जहाल विचारांच्या थिप्पारी तिरुपती उर्फ देवजीकडे सोपवल्याने भूपती नाराज होते. त्यांनी सशस्त्र संघर्ष संपवून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने तो फेटाळल्याने चळवळीत उभी फूट पडली आणि भूपतीने आपल्या गटासह बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या यशस्वी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

तसेच, आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेतून बक्षीस आणि इतर योजनांचा लाभ दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस महानिरीक्षक (अभियान) संदीप पाटील, विशेष अभियानचे अपर पोलीस महासंचालक छेरींग दोरजे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि.प. सीईओ सुहास गाडे , पोलीस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते.

‘तारक्का’कडून मुख्यमंत्र्यांचे आभार

भूपतीची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण केले होते. पतीच्या आत्मसमर्पणाने तिच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होते. आयुष्याच्या संध्याकाळी आता एकत्र सामान्य जीवन जगता येणार असल्याच्या भावनेने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले. मुख्यमंत्र्यांनीही या जोडप्याचा एकत्रित सत्कार केला.

ऐतिहासिक आत्मसमर्पण! भूपतीकडून शस्त्रे मुख्यमंत्र्यांच्या हाती, तर मुख्यमंत्र्यांकडून संविधान भूपतीच्या हाती.

१२ जहाल नेत्यांचा समावेश

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये दंडकारण्य विशेष समितीचे दोन तर विभागीय समिती व कंपनी क्र. १० च्या दहा अशा बारा नक्षल कमांडरचा समावेश आहे. यामध्ये सावी तुमरेटी, शर्मिला मडकाम, भीमा सोदी, अमोल सोदी, मंजू कोवाची, कोसा कोवासे, प्रियंका तेलामी, रोशनी कुडचामी, विवेक उर्फ भास्कर यांच्यासह एकूण ६१ जणांनी गणवेशात स्वयंचलित शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.