“नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्यामुळे नागपूर महापालिकेवरील विजयाची देशभरातील राजकारणात चर्चा असते. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनो संघाचा गडातील महापालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा.”, असे आवाहन ‘आप’च्या नेत्या व दिल्ली सरकारच्या शिक्षण सल्लागार आतिशी यांनी केले. नागपूर येथे पक्षाच्या मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी आपचे विदर्भ प्रमुख डॉ. देवेंद्र वानखेडे व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगजीत सिंग यांनी आतिशी यांचा परिचय करून दिला, तर डॉ. वानखेडे यांनी प्रास्ताविक केले.

तसेच, “दिल्ली आणि पंजाबप्रमाणे नागपूर महापालिकेमध्येही आपल्याला एक प्रामाणिक सरकार द्यायचे आहे. पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असूनही शिक्षण, आरोग्य आणि पाण्याच्या समस्या जैसे थे आहेत. दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये खासगी शाळा सोडून विद्यार्थी येत आहेत. जेईई आणि नीटसारख्या परीक्षांमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थी उत्तीर्ण होत असून हे केवळ आम आदमी पक्षाने सरकारी शाळांचा चेहरा बदलल्यामुळे शक्य झाले.” आतिशी म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रामाणिक सरकार हीच आमची ताकद –

याचबरोबर, “ ‘मोहल्ला क्लिनिक’चा आज ७० टक्के महिला आणि वृद्धांचा लाभ होत आहे. मात्र, पंधरा वर्षांपासून नागपूर महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला हे करता आले नाही. आमच्याकडे काही जादूची कांडी नसून प्रामाणिक सरकार हीच आमची ताकद आहे. नागपूर शहरात दिल्लीच्या धर्तीवर १५६ जागतिक दर्जाच्या शाळा उभारणार तर १५ हजार लिटर पाणी मोफत देणार” असे आश्वासनही त्यांनी दिले.