गोंदिया : गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर रेल्वे रुळ दुरुस्ती सह इतर कामे केली जात आहे. तसेच दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे मंडळांतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर अतिरिक्त लुप लाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे २७ ते २९ जून २०२५ पर्यंत या मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती गोंदिया रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर लुप लाइनचे काम सुरू असल्याने गोंदिया-बल्लारशा या रेल्वे खंडात प्रवास करणाऱ्या रेल्वेगाड्या दोन दिवसाकरिता रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये गाडी बल्लारशा-गोंदिया २८ ते २९ जून रोजी दोन फेऱ्या, गाडी गोंदिया ते बल्लारशा २७ व २८ जून रोजी दोन फेऱ्या, चांदाफोर्ट ते गोंदिया २९ व ३० जून रोजी दोन फेऱ्या, गाडी गोंदिया- वडसा २८ व २९ जून रोजी दोन फेऱ्या, गाडी वडसा ते चांदाफोर्ट २९ व ३० जून रोजी दोन फेऱ्या, गाडी बल्लारशा ते गोंदिया २९ व ३० जून रोजी दोन फेऱ्या, गोंदिया ते बल्लारशा या रेल्वेगाडीचे २९ व ३० जून रोजी होणाऱ्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर मृत्युंजन रॉय यांनी दिली आहे.
जगन्नाथ यात्रे निमित्त गोंदियातून विशेष गाडी…
ओडिशा राज्यातील जगन्नाथ यात्रे निमित्त नागपूर रेल्वे विभागाच्या वतीने गोंदिया-खुर्दा रोड-गोंदिया ही विशेष रेल्वेगाडी २६ जून २०२५ पासून सोडण्यात येणार आहे. जगन्नाथ रथयात्रे निमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीने विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशातील पुरी येथे आयोजित जगन्नाथ रथयात्रे निमित्त गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊनगोंदिया ते खुर्दा रोड दरम्यान विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. गाडीला राजनांदगाव आणि डोंगरगड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी एकूण १८ डब्यांची राहणार असून त्यात सामान्य ६, एसएलआर २, स्लीपर ७, २ एसी १ आणि ३ एसीचे दोन डबे राहणार आहेत. गोंदिया-खुर्दा रोड-गोंदिया दरम्यान २६ जून, २८ जून, ३० जून, २ जुलै आणि ५ जुलै २०२५ ला दुपारी १:३० वाजता गोंदिया हून निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:४५ वाजता खुर्दा रोडला पोहोचेल. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने ही गाडी २८ जून, २९ जून, १ जुलै, ३ जुलै आणि ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता खुर्दा रोड येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:१५ वाजता गोंदियाला पोहोचेल.
बिलासपूर-काचेगुडा स्पेशल ट्रेन धावणार…
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन बिलासपुर-काचेगुडा-बिलासपूर दरम्यान ४ फेऱ्यांसाठी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बिलासपुरहून काचेगुडा गाडी क्रमांक ०८२६३ ही २३, ३० जून आणि ७, १४ जुलै रोजी सकाळी १०:०५ वाजता सुटेल. काचेगुडा येथे दुसऱ्या दिवशी पहाटे १:३० वाजता पोहोचेल. तर काचेगुडाहुन बिलासपूर गाडी क्रमांक ०८२६४ ही २४ जून, १, ८ आणि १५ जुलै रोजी पहाटे ४:३० वाजता सुटेल. बिलासपूर येथे त्याच दिवशी रात्री ९:३५ वाजता पोहोचेल.
या ठिकाणी थांबणार बिलासपूर-काचेगुडा विशेष ट्रेन
बिलासपूर, भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया, वड्सा, चांदाफोर्ट, बल्हारशा, सिरपूर कागजनगर, मंचिरियाल, रामगुंडम, काझीपेट, चरलापल्ली, मलकाजगिरी, काचेगुडा…