गोंदिया: पुर्नवसू या नक्षत्राने पहिल्याच आठवड्यात गोंदिया जिल्ह्याला धूवून काढले. ६ जुलैपासून सुरु झालेल्या तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वदूर पाणीच पाणी.. अशी परिस्थिती निर्माण केली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घर, गोठे व झाडांची पडझड झाली. तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात तिघांना जीव गमवावा लागला तर ५ जण गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर २८७ घर आणि ८४ गोठे क्षतिग्रस्त झाले आहे. तीन दिवसाच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले.
जून महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे मृग आणि आर्द्रा हे दोन नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा होती. त्यातच ६ जुलै पासून सुरू झालेला पुर्नवसू नक्षत्र जोरदार पाऊस घेवून आला. मागील दोन्ही नक्षत्रातील अवघ्या तीन दिवसात उणीव भरून काढली. ७ जुलै पासून तर सुरू झालेल्या संततधार पावसाने जिल्हा जलमग्न झाला. सततच्या पावसामुळे जिल्हयातील घर, गोठे व झाडाची पडझड सुरू झाली. परिणामी गोंदिया जिल्ह्याला तीन दिवसाच्या पावसामुळे जबर फटका बसला. सडक अर्जुनी तालुक्यात झाड कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले. तिरोडा तालुक्यात दोन घटनांमध्ये झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. त्याचबरोबर देवरी तालुक्यात पुराच्या पाण्यात एक बैल वाहून गेला. या जिवीतहानीसह गोंदिया जिल्ह्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावे लागले आहे.
तीन दिवसांत २२५ मिमी पाऊस
मृग, आद्रा या दोन्ही नक्षत्राला रूसलेल्या वरूणदेवाने पुर्नवसू या नक्षत्राला सरासरी पावसात भर पाडून चांगलीच कृपादृष्टी दाखविली. गेल्या तीन दिवसात २२५.५ मिमी पाऊस पडला आहे. विशेषतः ८ जुलै रोजी तब्बल ११६.४ मिमी पाऊस पडला आहे. या दिवशी जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव हे दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. ७ जुलै रोजी ४८.५ मिमी, ८ जुलै रोजी ११६.५ मिमी तर ९ जुलै रोजी ६६.६ मिमी असा एकूण मागील तीन दिवसात सरासरी २२५.५ मिमी पाऊस पडला आहे. आज पर्यतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात १३३.१ टक्के पाऊस पडला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३१३.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या तीन दिवसाच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात ४१६.१ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची ही आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे.
अनेक मार्ग बंदच
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज उघडीप दिली. असे असतानाही जिल्ह्यातील नदी-नाले सतत ओसांडून वाहत आहेत. परिणामी आज दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद पडले आहेत. यामध्ये देवरी तालुक्यातील डवकी शिलापूर-फूकीमेटा, मूरदोली- चिचेवाडा, बोंडे-घोनाडी, फूटाना- हळदी, पळसगाव-तूंमडीमेढा तर सडक अर्जुनी तालुक्यातील घटेगाव ते गिरोला, बाम्हणी ते दल्ली, देवपायली ते मोगरा, चिंगी ते खोबा, राका ते कणेरी रस्ते, आमगाव तालुक्यातील कालीमाती- सुपलीपार, पाटीलटोला ते मोहगाव ही मार्ग बंद आहेत.
सालेकसा व गोंदियात सर्वाधिक नुकसान
गेल्या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात घर व गोठ्यांची पडझड सुरू झाली. मागील तीन दिवसात २८७ अंशत व पूर्णतः घर पडली आहेत. तर ८४ गोठ्याची नुकसान झाली. गोंदिया तालुक्यात १०४ घरे अंशतः तर ३३ गोठे, आमगाव तालुक्यात ३९ घरे तर २५ गोठे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात २० घर, एक गोठा, देवरी तालुक्यात २७ घरे, ७ गोठे, गोरेगाव तालुक्यात ११ घर, १ गोठे, सालेकसा तालुक्यात ४३ घर, ७ गोठे, तिरोडा तालुक्यात २६ घरे अंशत, ६ पूर्णतः व एक गोठा, सडक अर्जुनी तालुक्यात १० घर अंशतः, एक पूर्णतः व एक गोठा असे एकूण २८० घरे अंशतः, ७ घरे पूर्णतः व ८४ गोठे क्षतिग्रस्त झाले आहेत.