नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भात तीन पालकमंत्री आहेत आणि एक मंत्री पद आहे. पाकलमंत्र्यानी तीन जिल्ह्याची आणि मंत्र्यांनी उर्वरित जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यास पक्ष वाढण्यास मदत होईल, परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. जिल्ह्याचे दौरे करून दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले जावे, अशी मागणी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा आज नागपुरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला माजी मंत्री धर्मराव बाबा आश्राम, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, राजू कारेमोरे, मनोज कायंदे, माजी मंत्री सुबोध मोहिते, विदर्भाचे पक्ष निरीक्षक राजेंद्र जैन उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा, असे आहवान करताना पक्ष वाढण्याचा सल्ला दिला. तसेच आगामी काळात विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मेळावा घेण्यात येतील, असेही पटेल म्हणाले. ते म्हणाले, मेळावे आयोजित करून भाषणे देऊन पक्ष वाढणार नाही. त्यासाठी पक्षाचे काम खालपर्यंत गेले पाहिजे.
राष्ट्रवादीचे विदर्भात तीन पालकमंत्री आणि एक मंत्री आहे. मंत्र्यांनी प्रत्येकी तीन जिल्ह्याची जबाबदारी आणि एका मंत्र्यांनी उर्वरित जिल्ह्याचे जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच प्रत्येक महिन्याला जिल्ह्याचा दौरा करून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. पण, तसे होताना दिसत नाही. म्हणून पक्षाकडून संबंधित पालकमंत्र्यांना ताकीद देणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही कठोर भूमिका घेतली जाणार आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याचे दौरे करण्याचे आणि दर महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेश पक्षाने द्यावे. असे आपण अजित पवार आणि सुनील तटकरे यांना सांगणार आहे, असे पटेल म्हणाले.
काँग्रेसपासून दूरावलेल्या मतदारांवर लक्ष
विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता. आता राज्यात त्यांचे केवळ १६ आमदार शिल्लक आहेत. काँग्रेसपासून दूरावलेला मतदार आपल्याकडे वळू शकतो. त्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही पटेल म्हणाले.
महायुतीची गरज नाही- आत्राम
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष महायुती सरकारमध्ये आहे. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुका महायुतीसोबत लढण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी घेतली. विधानसभा निवडणुकीत काही लोकांनी आपल्याला धोका दिला. महायुतीच्या नेत्यांना बंडखोरांना आर्थिक मदत केली, असा आरोप करीत आता दगाबाजांना सोडणार नाही. आपण गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात स्वबळावर सत्ता आणू, असा दावाही त्यांनी केला.