नागपूर : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातच राज्यात उन्हाने रौद्र रूप धारण केले आहे. शनिवारी या मोसमातील सर्वाधिक ४४.७ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. जगभरातील “टॉप १५” सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांच्या यादीत नागपूरने शनिवारी नववा क्रमांक पटकावला. यापूर्वी एप्रिल महिन्यात ३० एप्रिल २००९ला नागपूर शहरात ४७.१ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. मात्र, असे आतांनाही विदर्भातील काही शहरांमध्ये वादळी पावसाचा अंदाज कायम आहे. गेली दोन आठवडे सातत्याने अवकाळी पावसाची हजेरी लागत होती. दुपारी उन्हाचा कडाका तर सायंकाळनंतर वादळीवारे आणि पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती.
हवामानात बदल कधीपासून ?
गुरुवारपासून मात्र हवामान कोरडे झाले आणि तापमानाने आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली. या दिवसापासूनच तापमानाची असह्य चटके बसण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी नागपुरात ४३ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. बऱ्याच वर्षानंतर नागपुरात तापमान ४४ अंश सेल्सिअसच्याही पलीकडे जाऊन पोहचले. एरवी मे महिन्यात तापमानाचा पारा एवढा वर जातो, पण यावर्षी मात्र एप्रिलच्या मध्यान्हतच तापमानाने कहर केल्यामुळे मे महिन्यात तापमान किती राहील याची धडकी नागरिकांना भरली आहे.
हवामान खात्याचा अंदाज काय?
दरम्यान, २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकानी काळजी घेण्याचे अवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने “यलो अलर्ट” कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे.
हवामान प्रणालीत कोणते बदल ?
दक्षिण उत्तर प्रदेश आणि त्यालगतच्या परिसरात समुद्र सपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे राज्यात दमट आणि ढगाळ वातावरण आहे आणि म्हणूनच उन्हाची काहिली वाढत आहे.
ऊन आणि पाऊस कुठे ?
रविवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने “येलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे.