गोंदिया: यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला आहे. दरम्यान, आर्द्रा लागला आणि गुरुवारपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक सुखावले आहेत. काही शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून कमी अधिक प्रमाणात रिपरिप पाऊस सुरू होता. ढगाळ वातावरण व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.आज मंगळवारी तर जिल्ह्यात १०७.८ मिमी पाऊस पडला असून गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात धान पिक प्रामुख्याने घेतल्या जाते. रविवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर सोमवारी सकाळपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. सायंकाळच्या सुमारास पावसाने जोर पकडला.

पाऊस झाल्याने देवरी ,अर्जुनी/मोर.आदी धान उत्पादक तालुक्यात काही शेतकऱ्यांनी धानाचे प-हे टाकणे सुरू केले आहे. मात्र, काही शेतकरी दमदार पावाच्या प्रतिक्षेत आहेत. सोमवारी पावसाने जोर पकडला. दुपारी दमदार सरी बरसल्या. लांबलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. विहीर, पंप असलेल्या शेतकऱ्यांनी धान रोपे तयार केली होती, तर आवत्या पद्धतीने धान पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. आवत्या पेरणी पद्धतीत शेतात अगोदर नांगरणी वखरणी करून धान शिंपल्या जातो. त्यानंतर पुन्हा उभी आडवी नांगरणी केल्या जाते. आता धान प्रत्यक्ष आवण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची आवश्यकता आहे. पुन्हा उन्ह तापले तर आवत्या पद्धतीने केलेल्या धान पेरण्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्याने गोंदिया बाजारातील दुकानात तसेच फुटपाथवर रंगीबेरंगी छत्री तसेच रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

हेही वाचा >>>फडणवीसांच्या जिल्ह्यातच जलयुक्त शिवारची कामे अर्धवट, शेतकऱ्यांना फटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुजारीटोला धरणाची दोन दारे उघडली

आज २७ जुन मंगळवार ला सकाळी ६:०० वाजता पुजारीटोला धरणाची पाणी पातळी वाढत असल्यामुळे धरण सुस्थीतीत/ नियंत्रणाकरीता ०२ गेट ०.३० मी. ने उघडण्यात आले आहे. यामधून ४५.१८ क्युमेक (१५९६ क्युसेक) विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे, तरी नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सोडण्यात आलेला विसर्ग सामान्य आहे नागरिकांनी कृपया नदीपात्र ओलांडू नये शेतीची अवजारे नदीपात्रात ठेवू नये जनावरांना नदीपात्र ओलांडू देऊ नये.जलाशयात येणारा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो असे जिल्हा प्रशासन कडून कळविण्यात आले आहे.