अकोला : बाळापूर मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वी देशमुख याच्यावर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी सशस्त्र हल्ला केल्याची घटना रविवारी सिव्हिल लाईन भागात घडली. आमदार पुत्राने स्वत:चा बचाव केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेवरून शिवसेना उबाठा गटाने आक्रमक भूमिका घेतली असून अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नेकलेस मार्गावर आमदार पूत्र पृथ्वी देशमुख आपल्या मित्रासह एका दुकानात उभा होता.

काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात पृथ्वी देशमुखला मारहाण करण्यात आली. आमदार पूत्र व त्याच्या मित्राने दुकानात धाव घेऊन स्वत:चा बचाव केला. या हल्ला प्रकरणातील आरोपी कृषी नगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले. तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा : नागपूर: काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना भेटले, जागा वाटपावर चर्चा?

गुन्हेगारी कृत्यात वाढ

माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. आज माझ्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला. एक जण चाकू घेऊन आला होता, तर एका जणाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. वारंवार या भागात गुन्हेगारी कृत्य घडत आहेत, असा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला.

हेही वाचा : नागपूर विमानतळावर राडा: नितेश राणेच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक, काय झाले…….?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात गुन्हेगारी वाढल्याचे वारंवार पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनात आणून दिले. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर होते. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. हल्ला, हत्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे.