भंडारा : विद्यार्थी खेळत असताना विटाची कच्ची भिंत पडली. विद्यार्थ्यानेच भिंत तोडली असे कारण पुढे करत शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बांबूच्या काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा तालुक्यातील मोटारा येथील प्रशांत विद्यालयात घडली. याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा तालुक्यातील माटोरा येथे प्रशांत विद्यालय आहे. या शाळेचे मुख्याध्यापक तथा संस्था चालक प्रदीप सुरेश गेडाम (वय ५५) रा. बेला हे आहेत. मुले खेळत असतांना शाळेत कच्ची विटाची भिंत पडली. मुख्याध्यापक तथा संस्था चालक प्रदीप सुरेश गेडाम यांनी शाळेतील इयत्ता ८ वीत शिकत असलेला विद्यार्थी कुलदीप नामदेव डोमळे (वय १४) रा. माटोरा याला यासाठी जबाबदार धरले.
विद्यार्थी कुलदीप डोमळे यानेच भिंत पाडली असे बोलून मुख्याध्यापक प्रदीप गेडाम याने लाकडी बांबूने विद्यार्थ्याच्या दोन्ही भुजांवर, पाठीवर, उजव्या खांद्याजवळ, डाव्या पायावर मारहाण करणे सुरु केले. यावेळी शाळेत कार्यरत मुख्याध्यापकाची पत्नी, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी मारहाण करणे सुरुच ठेवले. यात कुलदीप हा गंभीर जखमी झाला.
गावकऱ्यांना याची माहिती कळताच त्यांनी शाळेत घाव घेतली. परंतु, त्यावेळी मुख्याध्यापक प्रदीप गेडाम हे शाळेतून निघून गेले होते. त्यानंतर गावकरी कुलदीप ला घेऊन पोलीस स्टेशन कारधा येथे पोहचले. तेथे तक्रार दिल्यानंतर कुलदीपला सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले. या घटनेमुळे माटोरा व परिसरातील गावातील पालकांत असंतोष निर्माण झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून पोलीस स्टेशन कारधा येथे कलम ११८ (१) भा.न्या.सं. सहकलम ७५ बाल न्याय बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस हवालदार कुंदा लांजेवार हे करीत आहेत.