चंद्रपूर : जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आल्याने मंत्री पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. यामध्ये सलग सातव्यांदा विधानसभेत जाण्याचा विक्रम करणारे सुधीर मुनगंटीवार, तिसऱ्यांदा आमदार झालेले किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, सलग दुसऱ्यांदा व भाजपकडून पहिल्यांदा आमदार झालेले किशोर जोरगेवार या तीन जणांमध्ये स्पर्धा आहे. या जिल्ह्यातील बल्लारपूर, चिमूर, चंद्रपूर, राजुरा व वरोरा या पाच मतदार संघात अनुक्रमे सुधीर मुनगंटीवार, किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे व करण देवतळे असे पाच आमदार विजयी झाले आहेत. यामध्ये सर्वात जेष्ठ, अनुभवी तथा लोकप्रिय लोकप्रतिनिधी सुधीर मुनगंटीवार आहेत.

विधानसभेत सलग सात वेळा जाणारे विदर्भातील एकमेव आमदार आहेत. तसेच पालकमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी करीत चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जणांवर भाजपचे आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मंत्री पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असून स्थानिक भाजप कार्यकर्ते देखील मुनगंटीवार यांचा दांडगा अनुभव व कल्पकता लक्षात घेता चांगल्या खात्याची जबाबदार त्यांच्याकडे सोपवावी अशी मागणी करीत आहेत.

हेही वाचा : नागपूरमध्ये स्कूलबसमधील विद्यार्थी किती सुरक्षित ? यापूर्वी घडले अनेक अपघात

त्यापाठोपाठ चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांचे नाव आहे. चिमूर क्रांती भूमीत भांगडिया सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचाही मंत्री पदावर दावा आहे. तिसऱ्या क्रमांकावर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आहेत. जोरगेवार सलग दुसऱ्यांदा विजयी झाले असले तरी भाजपच्या तिकीटवर प्रथमच निवडून आले आहेत. मात्र त्यांनाही मंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. कॅबिनेट नाही तर किमान राज्यमंत्री पदी तरी जोरगेवार यांची वर्णी लावा अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी जोरकस पने लावून धरली आहे. वरोरा येथील करण देवतळे तथा राजुराचे देवराव भोंगळे प्रथमच निवडून आले आहेत. यातील भोंगळे हे मुनगंटीवार समर्थक आहेत. तर देवतळे यांचा कल मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे अधिक आहे. त्यामुळे अहिर ज्यांच्या बाजूनं उभे राहतील तिकडे देवतळे झुकतील अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्यातरी मंत्री पदासाठी भाजपात जोरदार अंतर्गत स्पर्धा सुरू आहे.

हेही वाचा : “जावई आणि लेकीने आता सासरी जावे”, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…

या स्पर्धेत कोण विजयी होणार हे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर स्पष्ट होणार आहे. केवळ मंत्री पदासाठी नाही तर पालकमंत्री पदासाठी देखील जिल्ह्यात स्पर्धा होणार आहे. त्यामुळे मंत्री पदाची लॉटरी कुणाला लागणार, कोणाचे नशीब फळफळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेते पद गमावले

ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे विरोधी पक्ष नेते पद जाणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कारण विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नाही. परिणामी विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसला गमवावे लागणार आहे.