गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सोडे गावात शासकीय आश्रमशाळेत सकाळी नाष्ता केल्यानंतर पुन्हा १७ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी १०६ विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकूण विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२३ वर पोहोचली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सोडे गावात माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आहे. २० डिसेंबरला दुपारच्या जेवणात विद्यार्थ्यांना कोबी, वरण भात व गाजर खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना डोकेदुखी, मळमळ असा त्रास जाणवू लागला. तब्बल १०६ विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.

हेही वाचा : “…तर संसदेचे प्रतिनिधित्वच कशाला करता?”, भाजपा प्रदेश सरचिटणीस यांचा सवाल; विरोधी पक्षांच्या खासदारांविरोधात निषेध आंदोलन

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ४८ तास या सर्वांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबरला सकाळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाष्त्यात वटाण्याची उसळ दिली होती. ती खाल्ल्यानंतर १७ विद्यार्थ्यांना मळमळ, डाकेदुखी असा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात ४७ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून उर्वरित ७६ जण धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, या घटनेने आश्रमशाळेत स्वयंपाक बनविताना निष्काळजी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे काही अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात असून त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

हेही वाचा : रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा; ‘या’ विशेष गाड्यांना मुदतवाढ मुंबई, पुणे, नाशिक, गोव्याला जाणे सोयीस्कर होणार

अन्न नमुने पाठवले प्रयोगशाळेत

दरम्यान, २० डिसेंबरला अन्न नमुने तपासणीसाठी घेेतले होते, २१ रोजी पुन्हा १७ जणांना विषबाधा झाल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील स्वयंपाकघरात भेट दिली. यावेळी तेथील वटाण्याच्या उसळचे नमुने तपासणीकामी घेतले आहेत. हे नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठविले जाणार असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.