नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सवानिमित्त शहरात कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला असून चार हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. दीक्षाभूमीवर ‘मिनी कंट्रोल रुम’ तयार करण्यात आले असून साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून अनुयायी शहरात येतात. दीक्षाभूमीवर भारतातील कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी दोन उपायुक्‍त दर्जाचे अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. अतिजलद प्रतिसाद पथकाचे जवान तैनात राहणार आहे. दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या चारही रस्त्यांवर वॉच टॉवर लावण्यात आले आहे.

हेही वाचा : बौद्ध धर्माकडे वाढता कल, २५ हजार नागरिक घेणार बौद्ध धम्माची दीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच बहुतांश अनुयायी रेल्वेने येत असल्याने नागपूर आणि अजनी स्थानकावर प्रचंड गर्दी असते. गर्दीत अनुचित घटना होऊ नये म्हणून सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोहमार्ग पोलीस, आरपीएफ, बीडीडीएस आणि श्वान पथक तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेकडून विशिष्ट मार्गाने येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. मंगळवार, २४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा असल्याने शनिवारपासूनच रेल्वे स्थानकाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. शहरात सर्वच पोलीस ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहे.