नागपूर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष गेल्यामुळे दुर्घटना टळली. शेख तौसीफ शेख फैजान (२३, रा. शहंशाह चौक, मोठा ताजबाग) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी एका छायाचित्रकाला मारहाण करून ६ हजार रुपये उकळणे आणि एका रेतीच्या टीप्परचालकाडून ४० हजार रुपये घेतल्यामुळे वादग्रस्त ठरलेले हुडकेश्वर पोलीस ठाणे पुन्हा चर्चेत आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख तौसीफने विशिष्ट समूदायाशी संबंधित असलेल्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती मुलगी शिक्षण सोडून तौसीफच्या प्रेमात वेडी झाली. तौसीफने तिला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले. गेल्या आठवड्यात मंदिरात दर्शनासाठी आईवडिल गेल्यानंतर तौसीफने तिला घरातून पळवून नेले. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत २१ जानेवारीला आरोपीला अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा…नागपुरात दोन गुन्हेगार जेरबंद; दोन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

तौसीफ सोमवारी रात्री साडेआठ वाजतापासून ब्लँकेटची दोरी तयार करीत होता. रात्री नऊ वाजता त्याने पोलीस ठाण्याच्या कोठडीच्या लोखंडी सळाखीला दोर बांधून गळफास घेतला. काही वेळाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचे लक्ष कोठडीकडे गेल्यामुळे प्रकार लक्षात आला. पोलिसांनी धावपळ करीत कोठडीचे कुलूप उघडले आणि त्याचा गळफास सोडविला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तौसीफ कोठडीतच बेशुद्ध पडल्यानंतर त्याला लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी आरोपी तौसीफवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा हलगर्जीपणा एका आरोपीच्या जीवावर बेतला असता. गेल्या काही दिवसांपासून हुडकेश्वर पोलिसांचा कारभार वादग्रस्त असून काही पोलीस कर्मचारी फक्त वसुलीत मग्न आहेत. डीबी पथक हॉटेल-ढाबेचालकांकडून रात्रीला वसुली करीत असल्याच्या नेहमी तक्रारी असतात.