नागपूर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात नासधूस व त्यानंतर उसळलेला हिंसाचार या घटनांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या दोन्ही घटनांबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेला फडणवीस यांनी सविस्तर उत्तरे दिली आणि कारवाईचा तपशील जाहीर केला.

बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या निर्घृण असून ती खंडणी मागितल्याच्या प्रकरणाशी निगडीत आहे. ही हत्या अतिशय क्रूरपणे झाली, त्यांच्या डोळ्यांना मार बसला होता. वाल्मिक कराड याचा खंडणी प्रकरणातील आरोपींबरोबर असलेल्या संभाषणाचे व अन्य पुरावे पाहता गुन्ह्यात सहभाग आहे. मात्र कराड याचा देशमुख हत्येतही सहभाग असल्याचे एसआयटी चौकशीत दिसून आले, तर त्याचे सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले, तरी त्याचा मुलाहिजा न बाळगता ‘मोक्का’नुसार कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आणि सरकार मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.

हेही वाचा >>>महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसाचाच

परभणी हिंसाचार प्रकरणात मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनात त्याचा श्वसनाचा आजार व आधीच्या जखमा निष्पन्न झाल्या आहेत. तरीही याप्रकरणातील सत्य पुढे यावे, यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन्ही कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख

बीड व परभणी प्रकरणांची चौकशी स्वतंत्रपणे होणार असून, अहवाल तीन ते सहा महिन्यांमध्ये येईल. हत्या झालेले सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना तर परभणी प्रकरणी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले.