scorecardresearch

‘झुंड’ सत्यावर तर ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपट असत्यावर आधारित ; संघर्ष करत सत्य समोर आणण्याची गरज – नाना पटोले

‘झुंड’ या चित्रपटाचे वास्तविक नायक व काँग्रेसचे पदाधिकारी विजय बारसे यांचा नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

विजय बारसे यांचा सत्कार करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. शेजारी विलास मुत्तेमवार

नागपूर : ‘झुंड’ चित्रपट सत्यावर तर ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपट असत्यावर आधारित असून त्याचा समाजातील असत्य व्यक्तीच प्रचार करत आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व असत्यावर आधारित ‘कश्मीर फाईल्स’पेक्षा सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या ‘झुंड’ चित्रपटातील वास्तव लोकापर्यंत पोहचवा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

‘झुंड’ या चित्रपटाचे वास्तविक नायक व काँग्रेसचे पदाधिकारी विजय बारसे यांचा नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवडिया भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला माजी खासदार विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, शेख हुसेन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. असत्यावर आधारित असल्यामुळेच ‘कश्मीर फाईल्स’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, ‘झुंड’ चित्रपट सत्यावर आधारित आहे, त्यामुळे त्याला ‘टॅक्स फ्री’ करण्याची गरज नाही. सत्य पराजीत होऊ शकत नाही. कश्मीर फाईल्स चित्रपटातून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे आणि केंद्र सरकार त्याचा प्रचार करत आहे. याविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून खरे सत्य काय आहे हे सांगण्याची गरज आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष सर्व धर्माबद्दल आदर ठेवतो. पं. नेहरूंना बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. देश विकून चालवणाऱ्यांच्या विरोधात लढा द्यायचा आहे, असे आवाहन पटोले यांनी केले. यावेळी विलास मुत्तेमवार यांनी विजय बारसे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास ठाकरे यांनी तर संचालन गजराज हटेवार यांनी केले.

विजय बारसे खरे महानायक

बारसे यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब मुलांना एकत्र आणून त्यांना घडवले. त्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या जीवनावर नागराज मंजुळे यांनी ‘झुंड’ हा चित्रपट तयार केला. त्यात अमिताभ बच्चन यांनी विजय बारसे यांची भूमिका साकारली. यामुळे विजय बारसे हे खरे महानायक आहे. या महानायकाचा सत्कार काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.

कानालान लागता कामालालागा

महापालिकेच्या निवडणुका तीन महिन्यांनी होण्याची शक्यता आहे. अनेक कार्यकर्ते कामाला लागले असून विविध उपक्रम राबवले जात आहे. तीनचा प्रभाग कायम राहणार आहे. यावेळी महापालिकेत पूर्ण बहुमताने काँग्रेसचा झेंडा फडकावयचा आहे. यामुळे उमेदवारीसाठी माझ्या ‘कानाला’ न लागता आता ‘कामाला’ लागा, असा सल्ला नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhund based on truth and kashmir files based on untruth nana potole zws