नागपूर: कोल्हापूरहून नागपूरसाठी निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत हिवरी शिवारात महामार्गावरील दुभाजकावर धडकली. घटनेत ३५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना माहिती कळताच झटपट रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले गेले. या घटनेमुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे.

जखमी प्रवाश्यांच्या माहितीनुसार, कोल्हापूरहून रविवारी (२३ मार्च) एमएच- ४० सीएम ५०३५ क्रमांकाची सैनी कंपनीची बस प्रवासी घेवून नागपूरच्या दिशेला निघाली होती. सोमवारी पहाटे हिवरी शिवारात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन थेट महामार्गावरील दुभाजकावर आदळले. अपघात इतका भीषण होता की, चालक हा बसच्या समोरचा काच फोडून बाहेर फेकला गेला. तर बसच्या वाहनाचे इंजिन तुटून थेट प्रवासी दरवाजाजवळ येउन धडकले. त्यामुळे वाहनाच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.

दरम्यान अपघातात बसमधील ३५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताचा आवाज एकूण परिसरात खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थली धाव घेतली. काहींनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य बघत तातडीने घटनास्थळ गाठले. त्यापूर्वी स्थानिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. पोलिसांनीही तातडीने रुग्णवाहिकेची सोय केली. त्यामुळे जखमींना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले गेले. उपचारादरम्यान बऱ्याच प्रवाश्यांचे हाड मोडल्याचेही पुढे आले. तर काही प्रवासी गंभीर असल्याचीही माहिती आहे. वृत्त लिहेस्तोवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातातील जखमी प्रवाशांची नावे

अपघातात जखमी रुग्णांमध्ये राजेंद्र उट्टलवार, अर्नव राजेंद्र उट्टलवार, योगेश नावलकर, अविनाश ढोबळे, गुलाब सिंग, रवी जाधव, सोनू नांद, नितिन शिवणकर, नितीन श्रीरामे, वैशाली जोशी, दीपक कुमार, महेशकुमार, आकाश नागरजोगे, शिवांश चावरे, वसंता भीतकर, एम.आर. बिलाल, राकेश भागवत, प्रज्योत, सुधीर पाटील, उमा शिवणकर, विशाल पेटूकले, विशाल मात्रे, कमला कोमेकर, जवेंद्रसिंग हरदयसिंग, अब्दुल हक अब्दुल शकील, गिरीश मिश्रा, ईश्वर आडे, शामबाला माळी, बबली मिश्रा, शिल्पा चन्ने, प्रविण पवार, रवींद्र वानखडे, धनराज चोरे आदीसह इतर प्रवाशांचा समावेश होता. हे प्रवासी नागपूर, सायखेडा, यवतमाळ, सांगली, भंडारा, वर्धा, कोल्हापूर, लातूर, जयपूर आदी जिल्ह्यातील आहे. या सगळ्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले गेले.