वर्धा : शासन विशिष्ट हेतूने खाजगी संस्था किंवा उद्योगांना शासकीय जागा लिजवर देत असते. त्यातून उद्योगपूरक किंवा सामाजिक हेतू साध्य करणारी फालनिष्पत्ती व्हावी. मात्र तसे झाल्याचे दिसून नं आल्यास शासन दिलेली जागा परत घेण्याचा हक्क राखून ठेवते. जागा देतांना तशा अटी नमूद असतात. आता या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील दोन गाजलेले उद्योग बंद पडल्याने त्याचा ताबा घेण्याची बाब पुढे आली आहे.
पुलगांव येथील कॉटन मिल व मांडवा येथील लॅन्कों विदर्भ थर्मल पॉवरची जमीन ताब्यात घेऊन त्यांवर जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी उदयोगाची निर्मिती करण्याची मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
पुलगाव येथील कॉटन मिल अनेकांना रोजगार देणारी होती. इथला गणपती उत्सव विदर्भात प्रसिद्ध होता.मिल मुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. काही वर्षांपासून मिल बंद पडलेली आहे. मिलची नझूल शिट क्र. २ भूखंड क्र. १८ क्षेत्रफळ 9.5 एकर या जागेचा कोणत्याही प्रकारचा उपयोग सध्या होत नाही आहे. ज्या कार्यासाठी ही जमीन देण्यात आली त्याचा शर्तभंग झालेला आहे. तथापि, ही जमीन शासन दरबारी जमा करणे आवश्यक आहे. मोक्याच्या जागी असल्याने या जागेवर एखादा उदयोग निर्माण केल्यास जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकेल. तसेच आर्थिक गतीचक्रावर देखील त्याचा परिणाम होणार आहे.
तसेच लॅन्को थर्मल पॉवर लिमी. कंपनी ने मांडवा, पुलई, बेलगाव येथील ३८४ हेक्टर जमीन खेरदी केली आहे. या जमीनीवर ६६६ मेगावॅटचे दोन पावर प्लॉंट तयार करण्यात येणार होते. २९८ हेक्टर आर जमीन खरेदीस सुधारित परवानगी देण्यात आली होती. मात्र याजागेवर पावर प्लॉट अदयाप अस्तित्वात आलेला नाही. त्यामुळे या जमीनीचा कोणत्याही प्रकारचा वापर आज होत नाही आहे. लॅन्कों विदर्भ थर्मल पावर ने विहीत मुदतीज जमीनीचा वापर न केल्यामुळे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम विदर्भ प्रदेश १९५८ मधील कलम ८९ चा भंग झालेला आहे.
त्यामुळे ही जमीन नियमानुसार शासन दरबारी जमा होणे क्रमप्राप्त असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या निर्दशनास आणून दिले. ही जमीन शासन दरबारी जमा करून या जागेवर एखादा मोठा उदयोग निर्माण करण्यात यावा. युवकांच्या हाताला काम मिळेल, असे ही पालकमंत्री डॉ. भोयर यांनी म्हटले आहे.
वर्धा जिल्ह्यात उदयोगांची कमतरता आहे. उद्योग नसल्याने जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या शोधासाठी इतरत्र जावे लागते. या दोन्ही जागेवर उद्योग निमिर्ती झाल्यास युवकांच्या हातला काम मिळेल तसेच जिल्हा देखील आर्थिक दृष्टया सक्षम होईल, असे ही पालकमंत्री भोयर यांनी म्हटले आहे. जागा ताब्यात घेण्याच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांना दोन्ही जागा शासन दरबारी जमा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे.