गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव वनपरिक्षेत्रातील रामनगर, कडोली व प्रतापगड या परिसरात मागील आठवडाभरापासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यांची तात्काळ दखल घेऊन या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी प्रादेशिक वनक्षेत्र गोठणगाव (नवेगावबांध ) यांच्याकडे केली आहे. त्याची दखल घेत गोठणगाव प्रादेशिक वन विभागाच्यावतीने या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे.
रामनगर, कढोली, प्रतापगड या परिसरातील विद्यार्थी दिनकरनगर येथे शिक्षण घेण्याकरिता जातात. या विद्यार्थ्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकांना दिली होती. शाळेने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून वनविभागाला लगेच याची माहिती दिली. वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी मिलिंद पवार यांनी याची तात्काळ दखल घेत या परिसरात वनविभागाच्या गस्तीपथकाला रात्रीला गस्त करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला
त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात गोठणगावपासून ५ किमी अंतरावर असलेल्या संजयनगर येथे बिबट्याने एका पाचवर्षीय मुलाचा बळी घेतला होता. त्यामुळे परिसरात नागरिकांत तीव्र रोष आहे. त्यानंतर आता आता पुन्हा या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवेगावबांध वनपरिक्षेत्रात येणाऱ्या संजयनगर येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका पाच वर्षे चिमुकल्याला ठार केले होते अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व या दक्षता घेतली जात आहे. पालक व शिक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार, रामनगर, संजयनगर तसेच गोठणगाव येथे गस्त घातली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. – मिलिंद पवार, वनपरिक्षेत्राधिकारी, प्रादेशिक वनक्षेत्र गोठणगाव.
सावरटोला येथे बिबट्याने केल्या कोंबड्या फस्त
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील विजय व्यंकट मुनेश्वर यांच्या गावालगतच्या शेतात असलेल्या कुक्कुट पालन केंद्रात बिबट्याने शुक्रवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास प्रवेश करून ६० ते ७० कोंबड्या फस्त केले आहे. यामुळे मुनेश्वर यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरगाव, चापटी, सावरटोला, बोरटोला, बीडटोला, भुरसीटोला परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या परिसरातील शेकडो कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या तर अनेक शेळ्यांचा बळी बिबट्याने घेतला आहे. त्यामुळे सावरटोला, बोरटोला, सुरगाव परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. परिसरात पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बिबट्या रोज कुठे ना कुठे शेळ्या, बकरे, कोंबड्या यांच्यावर ताव मारून पशुपालकांचे आर्थिक नुकसान करीत आहे. सावरटोला प्रकरणी विजय मुनेश्वर यांच्या तक्रारीवरून बाराभाटी सहवन क्षेत्राच्या बीट वनरक्षक मंगला खोब्रागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वनविभागाच्या वतीने घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.
