बुलढाणा : काल गुरुवारी, १२ जून रोजी संध्याकाळी व रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. यादरम्यान ठिकठिकाणी विजेचे तांडव पाहवयास मिळाले. सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी विजेच्या तांडवाने १८ मुक्या जनावरांचे बळी घेतले.

काल गुरुवारी संध्याकाळी उशिरा मोताळा तालुक्यात ग्रामस्थांना विजेचे रौद्र स्वरूप पाहावयास मिळाले. मोताळा तालुक्यातील शेलापुर बुद्रुक येथील शेत शिवारात वीज पडून १७ मेंढ्या व बकऱ्या जागीच ठार झाल्याचे मोताळा तहसील कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यामुळे मेंढपाळ बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलापूर बुद्रुक येथील ओंकार नारायण वाघ राहणार यांच्या दोन शेळ्या, निना नारायण वैतकार यांची एक शेळी, ईश्वरदास भिकाजी बावस्कर यांच्या दोन शेळ्या ठार झाल्या, शेलापूर बुद्रुक येथीलच सुधाकर भिकाजी बोरसे यांच्या पाच मेंढ्या, आणि सात शेळ्या दगावल्या. शेलापूर बुद्रुक येथील विजेच्या थैमानात १७ शेळ्या, मेंढ्या जनावरे दगावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खामगाव तालुक्यातही निसर्गाचे तांडव ग्रामस्थांनी अनुभवले. मौजे जयरामगड येथील गणेश लख्खू राठोड यांची एक गाय काल गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दगावली.दुसरीकडे भालेगाव बाजार (तालुका खामगाव) येथील अजीम हफीज शेख बशीर यांच्या शेतात एक मोठे निंबाचे झाड उन्मळून पडले. हे झाड म्हशीच्या अंगावर पडले. तिला गंभीर दुखापत झाल्याचे खामगाव तहसील कार्यलयाच्या सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुलढाण्यासह अनेक गावे अंधारात

काल रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी बुलढाणा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी थैमान घातले. यामुळे विजेचे खांब पडले तसेच मोठ्या संख्येने तारा तुटल्या. यामुळे रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बुलढाणासह अनेक गावे अंधारात बुडाली. बुलढाणा शहरात रात्री बारा वाजता काही वेळ वीज आली, मात्र ती पुन्हा गेली. आज शुक्रवारी देखील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. यामुळे शासकीय कार्यालये, रुग्णालय मधील काम ठप्प झाल्याचे दिसून आले. महावितरणने शुक्रवारी सकाळ पासून दुरुस्तीचे काम हात घेतले आहे.