संजीव कुळकर्णी

नांदेड : महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व केलेले वसंतराव चव्हाण यांच्यावर नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रसंग तसा अनपेक्षितपणे ओढवला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे पुढारपण दीर्घकाळ सांभाळणार्या अशोक चव्हाण यांनी गेल्या महिन्यात पक्षाला अचानक सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्या प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले, त्यात वसंत चव्हाण हे एक प्रमुख नेते. नायगावच्या चव्हाण घराण्याची राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसचीच. वसंतरावांचे वडील बळवंतराव चव्हाण हेही दोन वेगवेगळय़ा कालखंडात आमदार राहिले, त्याआधी ते नांदेड जिल्हा परिषदेच्या सत्तेतील एक प्रभावशाली नेते होते.

वयाच्या सत्तरीत आलेल्या वसंतराव चव्हाण यांची प्राथमिक राजकीय कारकीर्द १९७८ पासून सुरू झाली. सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य हा त्यांचा आरंभीचा प्रवास इतर अनेक कार्यकर्त्यांसारखाच. त्यावेळच्या बिलोली तालुक्याच्या राजकारणात या घराण्याचा मोठा दबदबा राहिला. तो आजही नायगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी कायम राखला आहे.

हेही वाचा >>>मेंढे, नेतेंना उमेदवारी अमरावतीचा तिढा कायम

नायगाव तालुका हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र. ती क्षमता आणि मर्यादा नायगाव-उमरी व धर्माबाद या तीन तालुक्यांना एकत्र करून २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर या नव्या मतदारसंघाच्या ‘सात-बारा’वर आपल्या नावाची नोंद करून वसंतराव विधानसभेत गेले. अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हे चव्हाण कुटुंब आधीची अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत होते, तेव्हा त्यांना जिल्ह्यातील प्रस्थापित नेतृत्वाशी संघर्ष करावा लागला, तरी बळवंतराव व नंतर वसंतराव हे कधी डगमगल्याचे दिसले नाही.

नायगावच्या चव्हाण घराण्याचा पिंड तसा स्थानिक आणि जिल्हा पातळीवरच्या राजकारणाचा. आपल्या साम्राज्यात आजवर त्यांनी कोणालाही वरचढ होऊ दिले नाही. राजकारणात भक्कम होत असताना त्यांनी नायगाव परिसरात आपले शैक्षणिक साम्राज्यही उभे केले. नायगाव तालुक्याच्या निर्मितीवेळी काही नेत्यांनी या नव्या तालुक्याचे मुख्यालय लगतच्या गावात करण्याचा घाट घातला तेव्हा चव्हाण गटाने तो हाणून पाडला त्यामुळे त्यांना नायगाव तालुका निर्मितीचे शिल्पकार मानले जाते.

हेही वाचा >>>छत्तीसगडच्या धर्तीवर विदर्भात बनावट महादेव अ‍ॅप सक्रिय

जिल्ह्यातल्या जुन्या नेत्यांनी राजकारण करताना जिल्ह्याच्या वेगवेगळय़ा तालुक्यांत नातेसंबंध निर्माण करत आपले ‘सगेसोयरे’ वाढविले. या बाबतीत चव्हाणांच्या मोठय़ा परिवाराची ख्याती जिल्हाभर असून त्यातून निर्माण झालेले संबंध, त्यांतील आपुलकी व सौहार्द चव्हाण कुटुंबाने जपला असून काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांसोबत ‘सग्यासोयर्याचे’ मोठे बळ या भरवशावर वसंतरावांनी लोकसभेच्या रिंगणात उडी टाकली आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झालेला आहे, पण ज्या अनेक कार्यकर्त्यांनी ‘अशोक मार्ग’ सोडून काँग्रेसमध्ये थांबण्याचा नि लढण्याचा निश्चय केला, त्यात जसे ९० वर्षीय ईश्वरराव भोसीकर आहेत तसे वसंतरावही आहेत. इतर कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन वसंतराव राजकीय लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा पराभव केला होता. पण या मतदारसंघात भाजपा किंवा अन्य कोणत्याही काँग्रेसविरोधी पक्षांना सलग दोन निवडणुकांत यश मिळालेले नाही. येथील ही परंपरा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलासा व उभारी देणारी मानली जाते. त्याची शिदोरी सोबत घेऊन वसंत चव्हाण यांनी नव्या राजकीय लढाईची तयारी केली आहे.