यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली संजय देशमुख यांनी ‘अपक्ष’ अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाकरे गटाचे संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांनी ३ एप्रिलला आमदार आदित्य ठाकरे व रोहित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यांनतर ४ एप्रिल रोजीही त्यांनी शिवसेना उबाठाकडून पुन्हा अर्ज दाखल केला. त्रुटीत अर्ज बाद होऊ नये, याची खबरदारी म्हणून अनेक उमेदवार एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करतात. संजय देशमुख यांनीही तेच केले. त्यांनी पक्षाकडून दोन अर्ज दाखल केले. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या संजय देशमुख यांच्या पत्नी वैशाली संजय देशमुख यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेही वाचा…अमित शहा यांचा पूर्व विदर्भ दौरा अचानक रद्द

वैशाली देशमुख यांनी शिवसेना उबाठाचे संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे यांच्या दिल्ली येथे सरकारी वकील असलेल्या पत्नी अर्चना सुर्वे यांना सोबत घेऊन हा अर्ज दाखल केला. काही त्रुटींमुळे अर्ज छाननीत बाद होण्याच्या भीतीतून संजय देशमुख यांनी पत्नी वैशाली देशमुख यांची अपक्ष उमेदवारी दाखल करून अतिरिक्त खबरदारी घेतल्याचे सांगण्यात येते. संजय देशमुख यांच्या या खेळीची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. उमेदवारी परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी वैशाली देशमुख अर्ज मागे घेतील, असे सांगितले जाते.

हेही वाचा…विश्लेषण : जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना दिलासा कसा मिळाला? सर्वोच्च न्यायालयाने काय कारण दिले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी खासदार हरिभाऊ राठोडही रिंगणात

बसपाकडून माजी खासदार हरिभाऊ उर्फ हरिसिंग नासरू राठोड यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बसपासोबतच त्यांनी अपक्ष म्हणूनही दोन अर्ज दाखल केले. हरिभाऊ राठोड हे यापूर्वी भाजपकडून यवतमाळ-वाशीमचे खासदार राहिले आहेत. त्यांनतर ते काँग्रेसकडूनही लढले मात्र पराभूत झाले. आता त्यांनी बसपाला जवळ केल्याने राठोड यांच्या दलबदलूपणाची चर्चा सुरू आहे. जिल्ह्यात बसपाचा जोर ओसरला असला तरी, यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये बसपाने काँग्रेसची मते कमी केली आहेत. यावेळी हरिभाऊ राठोड हे उमेदवार म्हणून कायम राहिल्यास ते बंजारा समाजाची मते घेऊन महायुतीचे नुकसान करण्याची शक्यता आहे.