नागपूर: काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. जवळपास ७० वर्षे काँग्रेस पक्षाची भारतावर सत्ता राहिली आहे. या काळात काँग्रेसचे अनेक पंतप्रधान होऊन गेले. यामध्ये इंदिरा गांधी यांचा काळ सर्वाधिक चर्चेचा होता. काँग्रेसवर अनेकदा हा गांधी परिवाराचा पक्ष आहे अशीही टीका होत राहिली आहे. सध्या राहूल गांधी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असून त्यांना आवश्यक तसे यश मिळालेले नाही. मात्र, त्यांनी मागणी काही वर्षापासून संविधान, एससी, एसटी, ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर बोलण्यास सुरुवात केली आहे. मात्र, यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
काँग्रेस हा इंदिरा गांधींच्या काळातही कधीच डाव्या विचारांचा पक्ष नव्हता. मात्र, राहूल गांधींनी पक्षाची धुरा सांभाळल्यापासून काँग्रेस अती डाव्या विचारांचा पक्ष झालेला आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असतानाही सरकारच्या धोरणांना विरोध करण्यापेक्षा ते कायम संविधानिक संस्थांवर हल्ला करतात. यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या संस्थांविषयी नकारात्मकता पसरल्यास हा देशातील लोकशाहीसाठी मोठा धोका असल्याची चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्र्यानी शहरी नक्षलवादावरही टीका केली. आता जंगलामधील नक्षलवाद संपत आला असून पुढे शहरातील नक्षलवादाला पकडण्याचे काम सुरू आहे. तरुणांच्या मनात देशातील संस्था आणि संविधानाविषयी नकारात्मक पसरवणाऱ्यांना शोधणे कठीण आहे. पण शहरी नक्षवाद संपवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
काँग्रेस संदर्भात नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री
ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेतृत्व अनेकांनी केले आहे. परंतु, इंदिरा गांधींच्या काळातही काँग्रेस कधीच डाव्या विचारांचा पक्ष झालेला नव्हता. मात्र, आज राहूल गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसने सरकारवर टीका करणे सोडून या देशातील संविधानित संस्थांवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. हे या देशातील लोकशाहीसाठी चुकीचे आहे. आपल्याच संस्थांचा विरोध करणे गैर आहे, असेही ते म्हणाले.
यासंदर्भात उदाहरण देताना फडणवीस म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयाने एखादा निर्णय हा काँग्रेस पक्षाच्या बाजून दिला तर त्यावेळी त्यांचा या देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास असतो. याउलट जर राहूल गांधींच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यास आपल्या देशातील न्यायव्यवस्था कशी सरकारधारजीनी आहे असे सांगत फीरतात. हे देशाच्या लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. आपल्या देशातील संस्थांविषयी येणाऱ्या पिढीमध्ये अशी नकारात्मकता पसरत गेल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
