वर्धा : शिक्षक व पटसंख्या याची सध्या शिक्षण वर्तुळत चिंतायुक्त चर्चा घडत आहे. आता त्यात वेतन विलंबाची भर पडली. मासिक वेतन हाच आधार असणारे बहुतांश शिक्षक आता व्याकुळ झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागातील मनपासह नगरपालिकांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांचे तीन महिन्यापासून रखडलेले वेतन केव्हा मिळणार, असा प्रश्न गाजत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या (३५८), चंद्रपूर महानगर पालिकेच्या (५५) , कामठी कटक मंडळाच्या (०७) आणि नागपूर विभागातील अन्य नगरपालिकांच्या (५५४) प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल, मे व जून महिन्याचे वेतन जुलै महिना संपत आलेला असताना सुद्धा झालेले नाही.

नागपूर विभागातील नगरपालिकांच्या प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन झाले नसल्याने शीघ्र कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १९ जून रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक आणि नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना कळविले होते.

त्याचप्रमाणे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांना येथे वर्धा येथे २१ जून रोजी निवेदन दिले होते. त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना तातडीने वेतन करण्याबाबत निर्देश दिले. परंतु एप्रिल व मे महिन्याच्या वेतनाबाबत कोणतीच कार्यवाही अद्यापही झालेली नाही. जून महिन्याचे वेतन सुद्धा जुलै संपत आलेला असताना सुद्धा झालेले नाही.

तब्बल तीन-तीन महिने शिक्षकांचे वेतन न होणे ही बाब प्रशासनिक अनास्था, औदासिन्य आणि बेजबाबदारपणाचच आहे. नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संबंधित आस्थापनेने याप्रकरणी पूर्णतः असंवेदनशीलता चालवली आहे. संबंधित शिक्षकांची कोणतीही चूक नसताना तब्बल तीन महिने शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणे ही क्रूर चेष्टा आहे.

महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त, राज्याच्या शिक्षण विभागाचे उपसचिव, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक यांना १७ जुलै रोजी निवेदन पाठवून नागपूर विभागातील महानगरपालिका व नगरपालिका अधिनस्त प्राथमिक शाळातील शिक्षकांचे वेतन तातडीने न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षकांची जिल्हा निहाय संख्या

नागपूर महानगरपालिका (३५८), चंद्रपूर महानगरपालिका (५५), कामठी छावणी कटक मंडळ (०७), गोंदिया जिल्हा (४८), वर्धा जिल्हा (८३), नागपूर जिल्हा (२८४), भंडारा जिल्हा (३४), चंद्रपूर जिल्हा (३६), गडचिरोली जिल्हा (६९) प्रशासनिक अनास्था व औदासिन्यामुळे तब्बल तीन महिने नागपूर विभागातील मनपा व नपाच्या शाळांतील ९७४ प्राथमिक शिक्षक दरमहा वेतनापासून वंचित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी विनंती करूनही प्रशासनिक यंत्रणेचे असलेले दुर्लक्ष अमानवीय व असंविदेनशीलतेचे दुर्दैवी द्योतक आहे. तब्बल तीन महिने वेतनापासून वंचित असणाऱ्या शिक्षकांच्या अडचणींचा प्रशासनिक यंत्रणेच्या अंमलबजावणी स्तरावर कुठेही विचार केला जात नाही हे निषेधार्ह आहे. आंदोलन करावे लागणार, असे मत विजय कोंबे राज्याध्यक्ष, म.रा. प्राथमिक शिक्षक समिती यांनी व्यक्त केले आहे.