नागपूर : राज्यातील अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढला होता. आठवड्याच्या अखेरीस पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा काही ठिकााणी मुसळधार पावसाचे अलर्ट दिले आहेत.
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रीय होत आहेत. त्यामुळे २५ ऑगस्टपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
येत्या २५ ते २८ ऑगस्टदरम्यान कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . २३ ऑगस्टला रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मराठवाड्यात धाराशिव लातूर व नांदेडमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरसह आज, २४ ऑगस्टला मराठवाड्यात परभणी, नांदेड व हिंगोली मध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२५ ऑगस्टपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणपट्ट्यातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
२६ ऑगस्टला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २७ ऑगस्टला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी सह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशिम तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळणार असून गणरायाच्या आगमनाला देखील मुसळधार पावसाची हजेरी असणार आहे.