नागपूर: मंगळवार हा निकालवार ठरला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी घोषित होणार हे ठरले होते. परंतु, केंद्रीय शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने बुधवारी बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचीही तारांबळ उडाली आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली आहे. शहराच्या अनेक शाळांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली.

परंतु, यावर्षी आश्चर्याची बाब म्हणजे एकाच दिवशी तीन परीक्षांचे निकाल जाहीर झाल्याने त्याचा परिणाम मिठाईच्या व्यवसायावर झाल्याचे पाहयला मिळाले. निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांचे कौतूक म्हणून आप्तेष्ट आणि शाळांमध्ये मिठाई वाटली जाते. एकाच दिवशी तीन निकाल जाहीर झाल्याने अचानक मिठाईची मागणी वाढली असून मंगळवारी शहरात लाखोंचा व्यवसाय झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शाळांच्या नजीक असलेल्या मिठाईच्या दुकानांमध्ये पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक झाल्याने व्यवसायिकांचीही तारांबळ उडाल्याचे चित्र होते.

राज्यात नागपूर विभाग पिछाडीवर

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ३.९५ टक्क्यांनी घट झाली आहे. ९०.७८ टक्के निकालासह नागपूर विभाग राज्यात सर्वात कमी निकाल देणारा विभाग ठरला आहे. २०२४ मध्ये नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी ९४.७३ नोंदवण्यात आली. मात्र, यंदा केवळ ९०.७८ टक्के निकालावर समाधान मानावे लागले आहे. विभागीय मंडळाकडून निकाल घटला तरी गुणवत्ताधारकांचे प्रमाण वाढल्याचा दावा केला जात आहे. परंतु, निकालात इतक्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

२०२४ मध्ये नागपूर विभागाच्या इयत्ता दहावीच्या निकालात २०२३ च्या तुलनेत २.२३ टक्क्यांनी वाढ झाली होती. यावर्षी मात्र वाढ कायम राखता आलेली नाही हे उल्लेखनिय. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाअंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. विभागीय मंडळामार्फत मार्च २०२५ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेकरिता नागपूर विभागातून १ लाख ४७ हजार ३५९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १ लाख ४६ हजार ११३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यापैकी १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २७,४६४ विद्यार्थी ७५ टक्के गुण मिळवित प्रावीण्यासह प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले.

४२,८८२ विद्यार्थी ६०टक्के गुण मिळवित प्रथम श्रेणीत, ४५,१८३ विद्यार्थी ४५टक्के गुण मिळवित द्वितीय श्रेणीत, १७,१२१ विद्यार्थी ३५टक्के गुण मिळवित तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विभागात एकूण १ लाख ३२ हजार ६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९०.७८ टक्के इतकी आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख ४७ हजार ३५९ परीक्षार्थींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. सर्वाधिक ५६ हजार ३०० विद्यार्थी नागपूरचे होते.