यवतमाळ: सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना शहरातील एका १८ वर्षीय मतिमंद युवतीच्या अज्ञानाचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने निर्गुडा नदीच्या रामघाट परिसरात नेत तिच्यावर अत्याचार केला. वणी शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
सदर युवती मानसिकदृष्ट्या विकलांग असून, ती नदी परिसरात एकटी फिरत होती. नराधमाने तिच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेत तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित युवतीला आई नसल्याने तिनं घडलेल्या घटनेबाबत तिच्या वडिलांना सांगितले. फिर्यादी वडिलांनी तत्काळ वणी पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वणी पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखाचे सतीश चावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देवून त्या नराधमाचा शोध सुरू केला. या घटनेने वणी शहरात संताप व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यात बालविवाह रोखला
अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथे नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले. तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या पुढाकाराने आणि विविध विभागांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली.
१८ वर्षांखालील मुलीचा विवाह ३० एप्रिल रोजी लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळताच पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीचे कागदपत्र तपासून तिचे वय १८ वर्षांखाली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देण्यात आली. कायद्यानुसार बालविवाह बेकायदेशीर असून त्याचे गंभीर दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले.प्रशासनाच्या मार्गदर्शनामुळे संबंधित कुटुंबीयांनी मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतरच विवाह लावण्याचे मान्य केले.
या मोहिमेत तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव वानखडे, समूह विकास अधिकारी कमलकर, बाल विकास परियोजना अधिकारी विकी जाधव, पोलीस उपनिरीक्षक हेमराज राठोड तसेच स्थानिक सरपंच, सचिव व पोलीस पाटील यांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. ग्रामीण भागात बालविवाहाच्या प्रथेला आळा घालण्यासाठी प्रशासनाची ही कृती जनजागृतीसाठी महत्वाची ठरत आहे. जिल्ह्यात यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहीम उघडली होती. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.