चंद्रपूर : नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनीने चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे बनावट ‘लेटरपॅड’ तयार करून खोट्या ‘रॉयल्टी क्लिअरन्स’ प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांची बनावट स्वाक्षरी करून तसेच अनाधिकृत शिक्का वापरून शासनाची सुमारे दीड कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नागपुरातील मे. मिडलँड स्टोन कंपनी मध्य रेल्वेत गौण खनिज पुरवठ्याचे काम करते. उपमुख्य अभियंता मध्य रेल्वे, वर्धा यांच्याकडे गौण खनिज पुरवठ्याचे काम या कंपनीने केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय बांधकामामध्ये वापरल्या जाणाऱ्या गौण खनिजाच्या स्वामित्वधनाबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून गौण खनिजाची परवानगी घेतली जाते. स्वामित्वधन भरल्यानंतर वाहतूक परवाना निर्गमित केला जातो. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून कंत्राटदाराची देयके अदा करताना गौण खनिज अधिकृतपणे वापरल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाकडून ‘रॉयल्टी क्लिअरन्स’ प्रमाणपत्र निर्गमित केले जाते. त्या आधारे शासकीय यंत्रणा कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्वधनाची रक्कम संबंधित कंत्राटदारास उपलब्ध करून देते.

मिडलँड स्टोन कंपनीने स्वामित्वधनाची जवळपास दीड कोटी रुपयांची रक्कम मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाचे अनधिकृत ‘लेटरपॅड’ तयार करून खोट्या ‘रॉयल्टी क्लिअरन्स’ प्रमाणपत्रावर जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांची बनावट स्वाक्षरी केली. तसेच अनधिकृत शिक्का मारून ही सर्व कागदपत्रे उपअभियंता, मध्य रेल्वे, वर्धा कार्यालयात सादर केली. उपअभियंता मध्य रेल्वे यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम यांच्याकडे कागदपत्रे पाठविली. दरम्यान, कागदपत्रे बघताच स्वाक्षरी, कार्यालयाचे ‘लेटरपॅड’, शिक्का आणि ‘रॉयल्टी क्लिअरन्स’ प्रमाणपत्र बनावट असल्याचे खनिकर्म अधिकारी नैताम यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांकडून तपास सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट, खोटी असल्याचे खनिकर्म अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेचे उपअभियंता यांना कळवले. तसेच याबाबत पोलीस तक्रार केली असून पुढील तपास सुरू आहे. ही सर्व बनावट कागदपत्रे तयार करण्यात जिल्ह्यातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्या काही बड्या कंत्राटदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.