वर्धा : आत्महत्या वाईटच. त्यातही आई आणि मुलगा जिवानीशी जात असतील तर प्रत्येकास हळहळ वाटणार. असे काही क्षण येतात आणि गावास चटका लावून जातात. ही घटना अशीच. हिंगणघाट तालुक्यातील फुकटा गावात घडलेली ही घटना आज सर्वांना धक्का देणारी ठरत आहे. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील असलेल्या घुले कुटुंबातील आईने दीड वर्षाच्या मुलीस घेत आयुष्य संपविले. घुले कुटुंब फुकटा गावात मेंढ्या चारण्यास आले. त्यांचा मेंढ्या सांभाळण्याचा पिढीजात व्यवसाय आहे.

हे कुटुंब मेंढ्या चारण्यास व त्यास शेतीवर बसविण्याचा व्यवसाय करते. घटनेच्या दिवशी कुटुंबाने मेंढ्या शेतात चरण्यास पाठविल्या. पत्नी घरी व पती बाहेर. पती घरी आल्यानंतर त्याने मेंढ्या कुठाय म्हणून विचारणा केली. या मेंढ्या शेजारच्या शेतात गेल्याचे उत्तर पत्नीने दिले. जा लवकर, त्या परत घेऊन ये असे पतीने निर्देश दिले . तिने नकार दिला. त्यामुळे चिडून पतीने पत्नी शशिकला हिला मारहाण केली. शेवटी संतापून ती मुलीला घेऊन मेंढ्या शोधण्यास गेली. मात्र रागाने ती धूमसत होतीच. तो राग तिने व्यक्त केलाच. परिसरात असलेल्या वारघने यांच्या शेतातील विहिरीत तिने बाळासह उडी घेत आत्महत्या केली.ही घडामोड बाजूला उपस्थित काही गावाकऱ्यांना दिसली. त्यांनी धावपळ करीत लोकं जमा केले. विहिरीतून माय लेकीस बाहेर काढले. पण तोवर दोघींचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही खबर सर्वत्र पसरली. मृत विवाहितेच्या माहेरील नातेवाईक घटनास्थळी पोहचले. पोलीस पण ही घटना माहित होताच घटनास्थळी आले. त्यांनी मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यांनी मात्र काहीच तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. मृत आई व मुलीच्या देहाचे शव विच्छेदन करण्यात आले आहे. वडनेर पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे. शशिकला पिंटू घुले २४, रा. परसोडी, जि. यवतमाळ व कविता पिंटू घुले अशी मृतकांची नावे आहेत. ही घटना परिसरात खळबळ तेवढीच हळहळ निर्माण करणारी ठरत आहे. मेंढपाळ कुटुंबात घडलेली ही घटना रागाच्या की आर्थिक अडचणीत घडली, यावर तर्कवीतर्क व्यक्त होत आहे. वडनेर पोलीस या प्रकरणात सर्व त्या बाजू तपासत आहे. फुकटा या गावातील स्त्री आणि पुरुषांना विचारणा केली जात आहे.