नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली आहे. तीन वर्षांआधी त्यांची एमपीएससीच्या सचिव पदावर प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची अचानक बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासन आदेशानुसार डॉ. खरात यांची कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ही एक भारतीय राज्यघटनेवर आधारित घटनात्मक संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवा व पदांसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करून पात्र उमेदवारांची निवड करते. ही संस्था भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ नुसार स्थापन झाली आहे. गुणवत्तेनुसार व आरक्षणाच्या नियमांनुसार भरती करते. एमपीएससी विविध राज्याच्या सेवा जसे की महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा आणि महाराष्ट्र वन सेवांसाठी परीक्षा आयोजित करते.

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात. एमपीएससीमध्ये सचिव हे प्रशासकीय महत्त्वाचे पद आहे. या पदावर तीन वर्षांआधी डॉ. खरात यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा चांगलाच वादग्रस्त ठरला होता. खरात यांच्या निवडीनंतर एमपीएससीच्या विविध परीक्षा आणि निकाल रखडल्याचा आरोपही अनेकदा झाला आहे.

मात्र, मराठा आरक्षणामुळे विविध परीक्षांच्या जाहिराती पुन्हा नव्याने तयार करण्यात आल्या. यामध्ये मराठा आरक्षणही लागू करण्यात आल्याने परीक्षा आणि निकालाला विलंब झाला होता. मात्र, या काळात डॉ. खरात यांच्यामुळे परीक्षांना विलंब होत असल्याचा आरोपही झाला होता. अखेर १९ सप्टेंबरला त्यांची कौशल्य विकास विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या सचिव पदाचा प्रभार कुणाकडे दिला जातो हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही.