न्यायव्यवस्था ही कोणत्याही दबावापासून मुक्त असेल, तरच न्यायदानाचं काम योग्य पद्धतीने होऊ शकतं, असं मानलं जातं. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवरच दबाव आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारणीभूत ठरली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एक आश्चर्यकारक घटना. कारण नादपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित बी. देव यांनी न्यायालयाचं कामकाज चालू असतान भर कोर्टात आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. तसेच, न्यायमूर्तींनी कोर्टासमोर माफीही मागितली आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती रोहित देव?

न्यायमूर्ती रोहित देव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती म्हणून सेवा देत होते. गेल्या वर्षी प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या खटल्यातून मुक्तता करणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते. सर्वोच्च न्यायालयाने हाच आदेश रद्दबातल ठरवून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० ऑगस्टपासून या प्रकरणाची पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.

“…तर मी माफी मागतो”

दरम्यान, न्यायमूर्ती रोहित देव यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करतानाच भर कोर्टात माफीही मागितली. “आपण सर्वांनी इथे काम करताना खूप मेहनत घेतली. माझ्या मनात तुमच्या कुणाबद्दलही राग किंवा वाईट भावना नाही. पण मी जर अनवधानाने तुम्हा कुणाला दुखावलं असेल, तर त्यासाठी मी आपली माफी मागतो”, असं न्यायमूर्ती राजीनाम्याची घोषणा करताना म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवृत्तीच्या दीड वर्षं आधीच दिला राजीनामा

२०१७मध्ये न्यायमूर्ती रोहित देव यांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी ते सरकारी वकील होते. दीड वर्षांनंतर, अर्थात ४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचा सेवाकाल समाप्त होणार होता. मात्र. त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.