अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उद्या २८ ऑक्टोबरला नागपूर येथे ‘महाएल्गार’ आंदोलनाची तयारी केली आहे. शेकडो ट्रॅक्टर घेऊन मोर्चेकरी नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीला जायचे की नाही, हे आज सायंकाळी वर्धा येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरवू, असे बच्चू कडूंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
बच्चू कडू म्हणाले, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात आपली शेतकरी नेते राजू शेट्टी आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे. वर्धा येथे कार्यकर्त्यांसोबत एक बैठक होणार आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जायचे की नाही, याविषयी निर्णय घेतला जाईल.
मागच्या बैठकीसारखे होता कामा नये, अशी आमची अपेक्षा आहे. निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभावावर वीस टक्के बोनस, हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करा, दिव्यांगांचे मानधन वाढवावे, मेंढपाळ, मच्छिमारांचे प्रश्न आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटायचे नाही, अशी आमची भूमिका आहे.
बच्चू कडू म्हणाले, पोकळ बैठका घेऊन काहीही होणार नाही. बैठकीत निर्णय होत असेल, तरच आम्ही सहभागी होऊ. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारच्या विविध ३८ विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आपल्याला आलेल्या पत्रात नमूद आहे. पण, मागण्यांसदर्भात निर्णय होणे महत्वाचे आहे.
आमची नागपूरात आठ दिवसही आंदोलन करण्याची तयारी आहे. आम्ही तिथेच तंबू ठोकू. मागे हटणार नाही. आम्हाला लेखी स्वरूपात मागण्यांची पूर्तता हवी आहे. तसे शासन निर्णय काढावे लागतील. या आंदोलनासाठी सर्वांनी मेहनत घेतली आहे. केवळ बैठक घेऊन, आम्ही बघू, करू, असे सरकार म्हणत असेल, तर आम्हाला ते मान्य नाही.
बच्चू कडू म्हणाले, सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार बांधव लाखोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार असून नागपुरात महाएल्गार सभा होणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी आम्ही १५१ सभा घेतल्या. प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वत: वर्गणी करून आंदोलनात येत आहेत. हे आंदोलन किती दिवस चालेल, हे सांगता येणार नाही, पण ही ‘आरपार’ची लढाई राहणार आहे. आता माघार घेणे शक्य नाही.
