नागपूर : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरजवळील बोरखेडी टोल नाक्याजवळील सर्पंच ढाबा अॅण्ड रेस्टॉरंट येथे अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राणी कल्याण विभागाने मोठी कारवाई केली.
रविवारी सकाळी १० वाजता प्राणी कल्याण अधिकारी राम नंदनवार, PFA (People for Animals) संस्थेच्या कार्यकर्त्या सुरभी लालवानी आणि बुटीबोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक लाकडे यांच्या नेतृत्वाखाली या ढाब्यावर छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये सुमारे ३० ते ४० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले.
या ढाब्याचे मालक फरुख खान यांच्यावर याआधीही अवैधरित्या मांस पुरवठा आणि विक्रीबाबत तक्रारी होत्या. त्यांना पूर्वी इशाराही देण्यात आला होता. मात्र तरीदेखील त्यांनी मांस विक्री सुरूच ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात एफआयआर (गुन्हा नोंद) केला असून पुढील तपास सुरू आहे.
ढाबा भाडे तत्वावर चालवला जात असला तरी गोवंश मांस विक्री ही गंभीर बाब मानली जात आहे. असे प्रकार शाकाहारी व प्राणीप्रेमी लोकांच्या भावना दुखावणारे असून, कायद्याच्या दृष्टीनेही गुन्हा आहेत.
PFA कार्यकर्त्या सुरभी लालवानी यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इतनकर (SPCA चे अध्यक्ष) यांच्याकडे विनंती केली की, नागपूर शहरातील सर्व अवैध मांस दुकाने व बेकायदेशीर कत्तलखाने यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांनी नागपूर महानगरपालिकेवरही (NMC) गंभीर आरोप करत सांगितले की, अनेक दुकाने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चालू आहेत.
“आम्ही प्राणीप्रेमी असून प्राण्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आता जबाबदारी घेत SPCA अंतर्गत तरुण व सक्रिय कार्यकर्त्यांची एक समिती स्थापन करावी, अशी जोरदार मागणीही केली.
या कारवाईमुळे दिवाळीच्या काळात शहरात अवैध मांस विक्रीबाबत जनतेमध्ये चिंता आणि संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून असे प्रकार थांबवावेत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.