नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी झटपट काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात केलेल्या रस्ते व पुलाच्या कामामुळे त्यांना विनोदाने रोडकरीही बोलले जाते. नितीन गडकरी यांनी नागपुरातील दिवाळी मिलन कार्यक्रमात नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण केले जाणार असल्याची घोषणा केली. नितीन गडकरी नेमके काय म्हणाले? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपूर आणि भंडारा दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग आता आणखी रुंद आणि सुरक्षित होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रकल्पासाठी तब्बल १ हजार ६०० कोटी रुपयांच्या जवळपास रुपये मंजूर करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. नागपूरात दिवाळी निमित्त आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, नागपूर- भंडारा मार्ग हा विदर्भातील सर्वाधिक गर्दीचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सध्या चारपदरी वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे हा मार्ग अरुंद पडत असून, सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या महामार्गावरून दररोज शेकडो मालवाहतूक ट्रक, प्रवासी बस, तसेच खासगी वाहने नागपूर आणि भंडारा दरम्यान ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत मोठी गर्दी होते. रस्त्याची रुंदी कमी असल्याने अपघातांचाही धोका वाढला आहे. नागरिकांना प्रवासात होणारा विलंब आणि मनःस्ताप लक्षात घेता, या महामार्गाचे सहापदरीकरण अत्यावश्यक झाले आहे. या महामार्गाच्या उन्नतीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून, आवश्यक प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. पुढील काही महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
सहापदरीकरणाचा फायदा काय ?
नागपूर- भंडारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणामुळे नागपूर-भंडारा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. तसेच वाहतुकीची सुरक्षितता वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता बांधला जाणार असून, दोन्ही बाजूंना सर्विस रोड, फूटओव्हर ब्रिज आणि योग्य प्रकाशव्यवस्था केली जाणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. या महामार्गामुळे भंडारा व नागपूर दरम्यानचा औद्योगिक आणि व्यापारी संपर्क अधिक मजबूत होईल, तसेच या परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. त्यामुळे हे काम केव्हा सुरू होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
