नागपूर : बोर व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आशिष अवथळे (वय ३२) असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मेटहिरजी येथील रहिवासी होता. मुख्य म्हणजे गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते.

वाघांच्या हल्ल्याच्या घटना आता चंद्रपूर जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिल्या नाहीत. तर वाघांची संख्या सगळीकडेच वाढत चालली आहे आणि वाघांच्या हल्ल्यात देखील वाढ होत आहे. बोर व्याघ्रप्रकल्पात बुधवारी घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जिल्ह्यात आतापर्यंत तरी वाघाच्या हल्ल्याच्या घटना फारश्या घडल्या नाहीत. मात्र, बुधवारच्या घटनेमुळे व्याघ्रप्रकल्प परिसरालगतचे गावकरीही आता दहशतीत आले आहेत. वर्षभरापूर्वी लग्न झालेला युवक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने गावकऱ्यांसह सारेच हळहळ व्यक्त करत आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पातील गरमसूर लगत असलेल्या मेटहिरजी शेतशिवारात बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वाघाने शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. यात तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी वाघाने केलल्या हल्ल्यात शेतकरी पूर्णपणे रक्तबंबाळ झाले होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आशिष अवथळे हा शेतकरी गुरांना चारा देऊन गावी परतत होता. हिंगणी वन्यजीव अभयारण्यातील उमरविहिरी या वनक्षेत्रात घडली, ज्यामुळे खळबळ उडाली. मृत आशिष हा गुरे चराईचे काम करत होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. नेहमीप्रमाणे, तो बुधवारी दुपारी जंगल परिसरात गुरे चरण्यासाठी घेऊन गेला. येथून परतताना बोर व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या हिंगणी वनपरिक्षेत्रातील उमरविहिरी बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक ४१ मध्ये झुडपात लपलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यात आशिषला स्वत:ला वाचवण्यासाठी जराही वेळ मिळाला नाही आणि अवघ्या काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच, हिंगणी वनपरिक्षेत्रातील वरिष्ठ वन्यजीव अधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा तयार केल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून वाघ परिसरात मुक्तपणे फिरत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला वाघिणीने केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव, वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले. परिसरातील शेजारील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.