नागपूर : “कॅटरिना” ला कोण ओळखत नाही. तिची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झालेले असतात. आता तर ती एकटी नाही, तर तिच्यासोबत तिची दोन मुले देखील आहेत. मात्र, तिचे सौन्दर्य तसूभरही कमी झालेले नाही. उलट ती आणखी आकर्षक दिसत आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात अलीकडे तिच्या मुलांसह ती फिरते आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील सहज दर्शन देत आहे. त्यामुळे बोर व्याघ्रप्रकल्पाकडे चाहत्यांचा ओढा वाढतच चालला आहे. बोर व्याघ्रप्रकल्पातील पर्यटक वाहन मालक मनोज लाखे यांच्यासह डॉ. जयंत वाघ, रवी पाटील, स्वाती पाटील, विनय लेले यांना “कॅटरिना” व तीचे बछडे दिसून आले.

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात “कॅटरिना” नावाची ही वाघीण आहे. पर्यटकांसाठी ती कायमच आकर्षण राहीली आहे. “कॅटरिना” व “टी-१” वाघाच्या जोडीला दोन बछडे आहेत. अलीकडे जंगल सफारीदरम्यान अनेक पर्यटकांना “कॅटरिना” दोन बछड्यांसह जंगलात फिरताना दिसून येत आहे. यामुळे पर्यटकांना “कॅटरीना”ची भुरळ पडली आहे. या अभयारण्याच्या अडेगाव प्रवेशद्वाराजवळ जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. बोर अभयारण्याचे क्षेत्रफळ १३८.१२ चौरस किलोमीटर आहे. नवीन बोर व जुना बोर अभयारण्य असे दोन विभाग आहेत. या अभयारण्याचे आकर्षण म्हणजे “कॅटरिना” वाघीण आहे. खऱ्या अर्थाने येथे “कॅटरिना” आणि “बाजीराव”ची जोडी पूर्वीपासून प्रसिद्ध होती. या जोडीने अनेक बछड्यांना जन्म दिला.

मात्र चार वर्षांपूर्वी ‘बाजीराव’ वाघाचा कोंढाळीजवळ अपघाती मृत्यू झाला. यानंतर ‘कॅटरिना’ एकाकी पडली होती. कॅटरिनाने ‘टी- ८’ हा वाघ नवा जोडीदार म्हणून शोधला. या दोघांची जोडी येथे प्रसिद्ध झाली. पर्यटकांना अनेक वेळा या जोडीने दर्शन दिले. सध्या या अभयारण्यात “टी-६” नावाची वाघीण, “टी- ७” वाघ, “टी-४” वाघीण आहे. जुन्या बोर अभयारण्यात “टी-३” म्हणजेच “कॅटरिना” वाघीण व “टी-८” वाघाची जोडी आहे. यामुळे अभयारण्य वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध झाले आहे. हिंगणा वनपरिक्षेत्रात नवीन बफर झोनमध्ये जवळपास ५८ टक्के वन जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यामुळे वन्यप्राण्यांचीही संख्या वाढणार आहे. कॅटरिना व दोन बछड्याची दमदार एन्ट्री बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिवसागणिक वाढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडक उन्हाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने जंगल सफारीवर थोडा परिणाम झाला, पण “कॅटरिना” च्या ओढीने पर्यटक येत आहेत. बोर अभयारण्यात अंभोरा, बोर धरण, मानोली, करई, बांबू घाटी हे पॉईंट्स पर्यटकांचे आकर्षण आहे. येथून वन्यप्राण्यांचे दर्शन होते. विशेषतः “कॅटरिना”ला पाहण्यासाठी पर्यटक आतुरलेले असतात. यातील एका पॉईंटवरून कॅटरिना निश्चित दिसते. यामुळे हे पॉईंट्स पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.