नागपूर : शहरातील व्यावसायिकाची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक करणारे माजी पोलिस अधिकारी सुनिल बोंडे यांच्यावरील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सीताबर्डी पोलिसांनी दिड महिन्यांपासून लांबवली आहे. त्यात या प्रकरणाचे धागेदोरे रामटेक येथील आनंद खंते यांच्या आत्महत्येशी जुळत आहेत का, अशी शंका निर्माण करणारा सवाल आता उपस्थित होत आहे.
आनंद खंते यांनी २ एप्रिल २०२५ ला रामटेक येथे आत्महत्या केली. या आत्महत्येला शेडनेट प्रकरणात झालेली फसवणूकच जबाबदार असल्याची तक्रार आनंदची पत्नी आणि भावाने पोलिसांत केली होती. शेडनेटच्या नावाने शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यक्तीनेच आनंदची पोलिस अधिकारी बोंडे यांची ओळख करून दिली होती. त्यानंतर झालेल्या फसवणूकीतून शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानेच आनंदने आत्महत्या केली.
दरम्यान या आत्महत्येची चौकशी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर कोणता अधिकारी दबाव टाकत होता, आत्महत्याला शेडनेट प्रकरणातला गैरव्यवहार कसे जबाबदार आहेत, या बाबतचे पुरावे खंते कुटुंबाने मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष तपास पथकही नेमले आहे.
त्यामुळे झोटींग यांची फसवणूक करणारा अधिकारी आणि खंते आत्महत्ये प्रकरणाच्या तपासात ढवळाढवळ करणारा अधिकारी यांचा परस्पर संबंध काय, का असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. याची सखोल चौकशी झाल्यास आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकंदर प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस खोलात जाऊन या प्रकरणाचा छडा का लावत नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एसआयटीचे काय झाले
शेडनेट योजनेतील चुकीच्या पद्धतीने झालेल्या कर्जवाटपात एका बँकेच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून या प्रकरणात एक पोलीस अधिकारी ढवळाढवळ करत होता. यातूनच आनंद खंते यांनी आत्महत्या केली. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खंते यांची पत्नी आणि भावाने १० मे २०२५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकक्षक या दोघांना तातडीने विशेष तपास पथक नेमण्याचे आदेश दिले होते. त्याचे पुढे काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
आनंद खंते आत्महत्या प्रकरणाशी माझा दुरूनही संबंध नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. –सुनिल बोंडे, सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त