नागपूर : मित्र म्हणजे जीवनातील एक असा व्यक्ती जो प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी आपल्या सोबत असतो. खरे मित्र हे आपल्याला समजून घेतात, प्रोत्साहन देतात आणि गरजेच्या वेळी मदत करतात. मित्रत्व म्हणजे विश्वास, प्रेम आणि सहकार्याचं नातं. हे नातं रक्ताचे नसूनही खूप घट्ट आणि खास असते. एक मित्र आयुष्यभराची साथ देणारा खरा संपत्ती असतो. मात्र नागपूरमध्ये मित्र असणे एका तरुणाच्या अंगलट आले. एका गुन्हेगारात सापडलेल्या अटक करण्यात आलेल्या तरुणांनी मित्राचे नाव घेतले आणि पोलिसांनी थेट त्या तरुणालाच अटक केले. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी गेल्यावर हे प्रकरण समोर आले.
आरोपीचा मित्र हा गुन्हा?
ओवेस खान हा बेराेजगार युवक असून मिळेल ते काम करताे. त्याचे काही मित्र अवैध धंद्यात सहभागी आहेत. यशाेधरा नगरात राहणारे आराेपी मुर्तजा अन्सारी, माेहम्मद सद्दाम व माेहम्मद वसीम हे तिघेही अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यातील आराेपी असून २३ फेब्रुवारीला पोलिसांनी या तीनही आराेपींना ताब्यात घेतले हाेते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे १७ ग्रॅम अंमली पदार्थ सापडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आराेपी मुर्तजा अन्सारी, माेहम्मद सद्दाम व माेहम्मद वसीम या तिघांना अटक केली.
न्यायालयाने तिघांना पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाेलीस काेठडीत असताना आराेपींनी मित्र ओवेश खानही या गुन्ह्यात सहभागी आहेत, असे पाेलिसांना सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी गुन्हा घडल्याच्या जवळपास बारा दिवसांनंतर म्हणजेच ४ मार्चला चाैकशीसाठी ओवेश खानला पाेलिसांनी चाैकशीसाठी बाेलावले. ७ मार्चला त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर अंमली पदार्थ विक्री करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला गेला. ओवेशने जिल्हा न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला. ओवेसने पाेलिसांना तपासात सहकार्य केले. त्याच्याकडून काेणताही अंमली पदार्थ जप्त न झाल्याची बाब बचाव पक्षाने अधाेरेखित केली.
आराेपीचा मित्र असणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी असेलच असा निष्कर्ष काढता येत नाही, असे निरीक्षण नाेंदवत जिल्हा व सत्र न्यायालयाने आराेपीचा जामीन मंजूर केला. ओवेश खान असे जामीन मंजूर केलेल्या आराेपीचे नाव आहे. न्यायालयाने ओवेशच्या अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटींची दखल घेतली व त्याच्याविरुद्ध पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद केले. त्याला अटींसह जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी तरुणाच्यावतीने ॲड. श्रीरंग भांडारकर, ॲड. अथर्व खडसे यांनी बाजू मांडली.