नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, शेतमालाच्या हमीभावासाठी, दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधनासाठी तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाएल्गार आंदोलन २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार आहे. आंदोलनाचे बच्चू कडू करणार असून आंदोलनात ट्रॅक्टरवर राज्यातील हजारो शेतकरी सहभागी होण्याचे संकेत आहे.

बेलोरा–आडगाव–यावली शहीद–मार्डी मार्गे वर्धा येथे मुक्काम घेत हे आंदोलन २८ ऑक्टोबरला नागपूरच्या बुटीबोरी येथे पोहचेल. रॅलीतील प्रत्येक ट्रॅक्टर “जय जवान, जय किसान” आणि “तिरंगा झेंडा” फडकवत स्वाभिमानाच्या घोषणांनी गजबजणार आहे. रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलबंड्या आणि मेंढपाळ बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. मेंढ्या–शेळ्या–बैलबंडी घेऊन हे बांधव बच्चू कडूंसोबत नागपूरच्या दिशेने रवाना होत आहेत.

आंदोलनासाठी अन्नसामुग्रीची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. सोलापूरहून २०,००० भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ, तसेच इतर भागांतून हुरडा व अन्नधान्य नागपूरकडे रवाना झाले आहे. गावोगाव चिवडा बनवण्याचे काम सुरू असून, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र या एल्गारासाठी सज्ज झाला आहे.

सरकारच्या घोषणांवर रोष…

“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने आजवर शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे. ना कर्जमाफी, ना हमीभाव — उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात–निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात कोसळला आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव घसरले, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ५,३३५ रुपये असूनही शेतकऱ्यांना ५०० ते ३,००० दरम्यानच विक्री करावी लागते. “हा कोणता आत्मनिर्भर भारत?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पूर्वीच्या आंदोलनांची परंपरा…

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही राज्य हलवणारी आंदोलनं झाली आहेत — रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस अन्नत्याग, लोकप्रतिनिधींच्या घरावर टेंबा आंदोलन, मोझरी येथे सात दिवसांचा अन्नत्याग, डॉ. भाऊसाहेब देशमुख यांच्या भूमीतून ‘पापड ते चिलगव्हाण’ पायदळ वारी आणि महाराष्ट्रभर ४,९०० किमीची शेतकरी हक्क यात्रा. तरीही शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस पाऊल उचलले नसल्याने यावेळी हा एल्गार आरपारचा असणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

१८२ किमी. जनशक्तीचा प्रवास

बेलोरा ते नागपूर असा १८२ किमीचा प्रवास निश्चित करण्यात आला आहे. या मार्गात अडगाव, यावली शहीद, डवरगाव फाटा, वर्धा, पवनार, सेलू, केळझर, खडक आणि अखेरीस बुटीबोरी येथे प्रवासाचा शेवट होईल. हजारो ट्रॅक्टर, ढोल-ताशांचा गजर आणि झेंडे फडकवणारे शेतकरी — हा दृश्यसमूह महाराष्ट्राच्या भूमीवर लोकशक्तीचा झंझावात निर्माण करणार आहे.

राज्यातील सर्व शेतकरी नेते एकत्र!

या महाएल्गार आंदोलनाला राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा पाठींबा मिळाला आहे. या मंचावर विजय जावंधिया, वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), राजू शेट्टी (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वामिनाथन शेतकरी संघटना), महादेव जानकर (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष),डॉ. अजित नवले (अखिल भारतीय किसान सभा),बच्चू कडू (मा. राज्यमंत्री, प्रहार जनशक्ती पक्ष), राजन क्षीरसागर (अखिल भारतीय किसान सभा – प्रगत मंच), प्रकाश जी पोहरे (अध्यक्ष, किसान ब्रिगेड), दीपकभाई केदार (ऑल इंडिया पॅंथर सेना), प्रशांत डिक्कर (स्वराज्य पक्ष), विठ्ठलराजे पवार (शरद जोशी विचार मंच, शेतकरी संघटना)या सर्व नेत्यांची एकजूट आहे.

ही अंतिम लढाई- बच्चू कडू

“आता हा महाएल्गार शेतकऱ्याच्या न्यायाचा आहे. ही लढाई शेवटची आहे. आम्ही मागे फिरणार नाही,” असा ठाम इशारा मा. बच्चू कडू, प्रहार जनशक्ती पक्ष यांनी दिला आहे.