नागपूर: नागपूरला पावसाने झोडपल्याने नरसाळा स्मशानभूमी परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी तुंबले. येथे पाण्याची पातळी वाढतच असून त्यात अडकलेल्या नागरिकांना बोटीद्वारे बाहेर काढले जात आहे. तर सक्करदरा सोमवारी पेठ परिसरात अनेक घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नागपुरातील नरसाळा स्मशानभूमी जवळ नाल्यांना पूर आला. त्यामुळे नरसाळा परिसरातील खोलगट भागात चांगलेच पाणी शिरले आहे. येथे पाण्याची पातळी वाढतच आहे. दरम्यान येथे काही माणसे फसली असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानांनंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने बोटीसह येथे पोहचले असूनबचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
सक्करदरा केंद्रातर्गत येणाऱ्या सोमवारी पेठ कॉटन येथे राहणाऱ्या निलेश गव्हाने यांच्या घरात पाणी शिरलेले आहे. अग्निशमन दालने या घरासह परिसरातील घरातू। पाणी काढण्याचे कार्य सुरु केले आहे. येथील गडर चोक झाल्याने पाणी घरात शिरल्याचा अग्निशमन दलाचा दावा आहे. मंगलदिप नगर परिसरातही पावसाचे पाणी तुंबले आहे. कळमना आणि दत्तात्रय नगर परिसरातही पावसाचे पाणी तुंबले. येथेही अग्निशमन दलाकडून पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरातील अनेक भागात पाणी साचलेले दिसून येते. शहरातील प्रमुख भागांपासून ते सखल भागांपर्यंत रस्त्यांवर पाणी साचलेले दिसून आले. अनेक ठिकाणी रस्ते तलावात रूपांतरित झालेले दिसले. त्यामुळे रस्त्यावर वाहने रेंगाळताना दिसली. नागरिकांना दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येत नाही. त्याच वेळी, बाजारपेठांसह प्रमुख मार्गांवर गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
उपराजधानी नागपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण तसेच शहरी जीवनावर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांतही असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे लक्षात घेता, जिल्हा दंडाधिकारी विपिन इटनकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये असेल.
वाहतूक बंद
रविवारी रात्री पासून जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली आहे. वैनगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने मौदा, कन्हान, रामटेक आणि कुही भागातील नदी – नाले आणि ओढ्यांवरील पाणी वाढले आहे. त्यामुळे या भागातील ११ मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मौदा तालुक्यातील तारसा ते जोड रस्ता, नवेगाव ते कोराड, नालादेवी ते किरणापूर, मालोडी ते नवंगाव आणि मांदगली ते धामणगाव मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. कन्हान भागातील पेडी ते अजनी, रामटेक तालुक्यातील चौदान डोंगरी मार्ग, बनपूरी ते नगरधन आणि चौगान ते मुसेवाडी पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे. कुही मुसळगाव आणि चितापूर ते भानेवाडा मार्गावरील वाहतूकही थांबविण्यात आली आहे.