नागपूर : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार नागपूरमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस ३० मार्च असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तेथून पुढे प्रचारासाठी फक्त १८ दिवस उरतात, इतक्या कमी वेळेत प्रचाराचे नियोजन करून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे असणार आहे.

२० मार्चला निवडणुकीची अधिसूचना निघणार असून त्याच दिवसापासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. २७ मार्च हा यासाठी शेवटचा दिवस आहे. ३० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. ३१ मार्च ते १७ एप्रिल हे अठरा दिवसच खऱ्या अर्थाने प्रचारासाठी मिळणार आहे. नागपुरात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून २१ लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यांच्यापर्यंत इतक्या कमी वेळेत पोहोचणे यासाठी उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

हेही वाचा – अल्पसंख्याक व्याख्येचा पुनर्विचार करायला हवा; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे मत

घरोघरी जाऊन मतदारांची भेट, मिरवणुका, चौक सभा, राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा या माध्यमातून उमेदवार प्रचार करीत असतात. आता घरोघरी जाणे शक्य नसल्याने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उमेदवारांचे पत्रक मतदारांपर्यंत पोहोचवणे, चौकाचौकात सभा घेऊन मतदारांना आवाहन करणे, प्रचार मिरवणुकांच्या माध्यमातून वस्त्यावस्त्यांना भेट देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. प्रचारासाठी मिळणारा अवधी लक्षात घेतला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ देता येणार नाही. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची उमेदवारी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच घोषित झाल्याने त्यांनी प्रचार सुरू केला आहे. मात्र, अन्य पक्षाचे उमेदवार जाहीर व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळण्याची शक्यता कमीच आहे.

२०१९ मध्ये काँग्रेसने पटोले यांच्या उमेदवारीची उशिरा घोषणा केली होती. त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता हे येथे उल्लेखनीय. यंदाही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भाजपची संघटनात्मक बांधणी बुथपातळीपर्यंत भक्कम स्वरुपाची आहे. त्यामुळे त्यांचा प्रयत्न प्रत्येक मतदारांपर्यंत राहणार आहे. शहर काँग्रेसतर्फेही वॉर्ड अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहे. परंतु, उमेदवार जाहीर न झाल्याने कार्यकर्ते सध्या शांत आहेत.

हेही वाचा – पंतप्रधानांच्या सभेचे आधी काम, नंतर निविदा सूचना! २०.५५ कोटींची कामे; बांधकाम विभागाचा कारभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमांचा वापर

प्रचारासाठी समाजमाध्यमांचा वापर केला जात आहे. चित्रफितींच्या माध्यमातून उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहेत, प्रचार मिरवणुकीचे समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केले जाते. त्यामुळे प्रचाराला मिळणारा कमी वेळ या माध्यमातून भरून काढला जातो.