चंद्रपूर: लोकसेवक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून खोटे शासकीय शिक्का असलेले नियुक्तीपत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे ओळखपत्र देऊन नगदी व बॅंकेद्वारे अशी २९ लाख रूपयांनी फसवणूक करणाऱ्या नागपुरच्या लॉरेन्स मारिदास हेनरी याला दुर्गापूर पोलीसांनी अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपी लॉरेन्स हेनरी याला २० सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नागपूर येथील रहिवासी असलेला लॉरेन्स हेनरी याने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेकांची मी लोकसेवक आहे, शासकीय सेवेत नोकरी लावून देतो असे म्हणून शासकीय शिक्के असेले नियुक्तीपत्र, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे ओळखपत्र दाखवून फसवणूक केली. याप्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारींच्या आधारावर दुर्गापूर पोलीसांनी आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादीची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लाॅरेन्स मारिदास हेनरी रा. नागपूर या आरोपीला अटक केली आहे.
लाॅरेन्स याने सहकारी आरोपीचे मदतीने लोकसेवक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. हेनरी याने खोटे शासकीय शिक्का असलेले नियुक्तीपत्र व महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे ओळखपत्र देऊन नगदी व बॅंकेद्वारे असे एकुण २९ लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली ही बाब उघडकीस आली आहे.या प्रकरणी आरोपी लाॅरेन्स मारिदास हेनरी याला गुरूवार १८ सप्टेंबर रोजी गुरूवारी रिमांड कामी हजर करण्यात आले होते.
त्यावेळी लोक अभिरक्षक कार्यालयाने आरोपीला मोफत विधी सेवा पुरविली. मुख्य लोक अभिरक्षक अॅड विनोद बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड अनुपमा फलके यांनी न्यायालयात आरोपीची बाजु मांडली. आरोपीला पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलीसांनी तसा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.आरोपीचे वतीने विरोध करण्यात आला .मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहुन तसेच पोलीसांना गुन्ह्याचे सखोल तपासाची संधी मिळावी यासाठी पोलीसांनी केलेली विनंती न्यायालयाने मंजुर केली व आरोपीला २० सप्टेंबर शनिवार पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.आरोपीला रिमांडकामी शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.