नागपूर : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण संपूर्ण देशभर गाजले. बनावट प्रमाणपत्रे आणि नाव बदलून त्यांनी अनेकदा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्यामुळे हा विषय चांगलाच गाजला होता. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सह परीक्षा घेणाऱ्या अनेक संस्थांनी याबाबत कठोर पावले उचलली आहेत. आता अपंग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी केली जाते. मात्र राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार चिंतामण वंजारी यांनी बहिरेपणाचे खोटे प्रमाणपत्र देऊन एमपीएससीची फसवणूक करत नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याचे सूत्रधार चिंतामण वंजारी अटकेत असून त्यांनी यापूर्वी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे फसवणूक करत पदोन्नतीही मिळवल्याचा आरोप आहे. तसेच शिक्षणाधिकारी पदावर असताना त्याच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.

वंजारीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षणाधिकारी पदासाठीच्या परीक्षेत अपंग संवर्गातून अर्ज केला होता. बहिरेपणाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारावर त्याने नोकरी मिळवल्याची तक्रार यापूर्वीही ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, दोन वर्षांपासून यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या तक्रारीनुसार नागपूर येथे शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून रूजू झाल्यावर माध्यमिक विभागाचा प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे. यादरम्यान काही शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अनुसूचित जमातीच्या संवर्गातून बनावट जातीच्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली असता वंजारी यांनी अशा कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करून सेवासंरक्षण दिले. त्याची तकार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडे केल्यावरही त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. याशिवाय शिक्षणाधिकारी वंजारी यांनी पुण्यश्लोक शाळेतील अनुसूचित जमातीच्या संवर्गातून ‘माडिया’ जात प्रमाणपत्रावर लागलेल्या ‘माळी’ कर्मचाऱ्यांला पाठीशी घालण्याचे काम त्यांच्या कार्यकाळत केले असून चौकशी प्रकरण थंडबस्त्यात ठेवले. मात्र, यातील कुठल्याही प्रकरणाची अद्याप चौकशी झाली नाही, असा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियुक्तीवरच कारवाईची शक्यता

चिंतामण वंजारी सध्या विशेष तपास पथकाच्या अटकेत आहेत. यावेळी चौकशीदरम्यान वंजारीने बनावट प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचे एसआयटीच्या लक्षात आले आहे. शासनाची फसवणूक करत वंजारी याने नोकरीसह पदोन्नती मिळवत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे वंजारी बनावट प्रमाणपत्राचा तपासही पोलीस करत असून त्याच्या नियुक्तीवरच कारवाई होण्याची शक्यता आहे. वंजारी यांची चौकशी केली असता ते कुठल्या प्रकारे बहिरे असल्याचे लक्षात आलेले नाही, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.